ढाका : बांगलादेशातील न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणाच्या सुनावणीस वारंवार अनुपस्थित राहत असल्यामुळे माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना अटक करण्याचे आदेश आज दिले. ही घडामोड देशात सुरू असलेले राजकीय संकट आणखी गहिरे करू शकते. ‘आपले पक्षकार सुरक्षेच्या कारणास्तव उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे सुनावणी लांबणीवर टाकण्यात यावी’, अशी मागणी झिया यांच्या वकिलांनी न्यायालयात केली. त्यानंतर विशेष न्यायालयाने झिया यांचे अटक वॉरंटच काढले. विशेष न्यायाधीश अबू अहमद जामदार यांनी हे वॉरंट जारी केले. झिया अनाथालय ट्रस्ट आणि झिया चॅरिटेबल ट्रस्टमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची सुनावणी करीत असून या दोन्ही प्रकरणांत माजी पंतप्रधान व त्यांचे फरार पुत्र तारिक रहमानसह इतर आठ जण आरोपी आहेत. झिया यांनी २००१ ते २००६ दरम्यान पंतप्रधान म्हणूनच्या आपल्या अखेरच्या कार्यकाळात या दोन प्रकरणांत ६ लाख ६५ हजार डॉलरचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. देशात राजकीय अस्थिरता असताना विशेष न्यायाधीशांनी हा आदेश दिला आहे. झिया यांची बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी सहा जानेवारीपासून राष्ट्रव्यापी आंदोलन करीत असून आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात ११० नागरिकांचा बळी गेला आहे. (वृत्तसंस्था)
माजी पंतप्रधान झियांविरुद्ध अटक वॉरंट जारी
By admin | Published: February 25, 2015 11:53 PM