अम्मान : पश्चिम आशियातील तीन देशांच्या दौऱ्यावर निघालेले भारताचे राष्ट्रपती पहिल्या टप्प्यात जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये पोहोचल्यानंतर तेथे त्यांचे पारंपरिक रीतीने स्वागत करण्यात आले. मुखर्जी यांना विमानतळावरून थेट अल हुसैनी महालात नेण्यात आले. शिष्टमंडळस्तरीय चर्चेपूर्वी राजे अब्दुल्लांसोबत मुखर्जींची अर्धा तास स्वतंत्र चर्चा झाली. अब्दुल्ला हे जॉर्डनचे राष्ट्राध्यक्षही असून देशाची सर्व सूत्रे त्यांच्या हाती आहेत. चर्चेनंतर अब्दुल्लांनी मुखर्जींच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले. मुखर्जींसोबतच्या शिष्टमंडळात केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत, काँग्रेसचे के. के. व्ही. थॉमस आणि भाजपच्या मीनाक्षी लेखी यांच्यासह सहा खासदारांचा समावेश आहे. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर राष्ट्रपती पॅलेस्टाईन व इस्रायलच्या दौऱ्यावर जातील. तीन देशांच्या दौऱ्यावर जाणारे ते भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत. परदेश दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मुखर्जींनी या दौऱ्याला ऐतिहासिक संबोधले होते. अलीकडे इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून यामुळे राष्ट्रपतींना ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याच्या कार्यक्रमात कपात करावी लागली. (वृत्तसंस्था)दहशतवादाविरुद्ध लढणारराष्ट्रपती मुखर्जी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान भारत व जॉर्डनने दहशतवादाविरुद्ध व संरक्षण क्षेत्रात परस्परांना सहकार्य करण्यास सहमती दर्शविली. जॉर्डन हिंसाचारग्रस्त पश्चिम आशिया क्षेत्रात दहशतवादाविरुद्धच्या लढाईतील प्रमुख देश आहे. पहिलेच राष्ट्रपतीजॉर्डनशी मुत्सद्दी संबंध प्रस्थापित झाल्यानंतर गेल्या ६५ वर्षांत या देशाच्या दौऱ्यावर जाणारे मुखर्जी हे पहिले भारतीय राष्ट्रपती आहेत. १९८८ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान म्हणून जॉर्डन दौऱ्यावर गेले होते. राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान भारत उभय देशांतील व्यापार वाढविण्याची संधी शोधेल.