मोठमोठ्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये अनेकदा अशी फसवणूक होते की त्यामुळे घटकेमध्ये हजारोंचं नुकसान होतं. इंग्लंडमधील कॉर्नवालमध्ये ब्रिटानिया इनमध्ये अशीच काहीशी घटना घडली आहे. येथे एका हॉटेलमध्ये एक कुटुंबं आलं. त्यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत एकूण १२ जण होते. आता अशा कुटुंबाकडून फसवणूक होऊ शकते, असा विचार कुठल्याही हॉटेल मालकाच्या मनात येणं शक्य नाही. मात्र या लोकांनी जे काही केलं त्यामुळे पबचा मालिक अवाक झाला आहे.
या कुटुंबानं आधी दाबून भोजनावर ताव मारला. सोबतच सहा बाटल्या फ्रूट शूट आणि १० बाटल्या स्लेटा बीयर प्यायली. त्याचं एकूण बिल २६ हजार रुपये एवढं झालं. हे बिल घेण्यासाठी जेव्हा वेटर त्यांच्या टेबलकडे गेले तेव्हा हे संपूर्ण कुटुंब फरार झालं होतं. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर पबकडून पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. सोबतच फेसबूकवरूनही मदत मागण्यात आली आहे.
फेसबूकवर या लोकांचे सीसीटीव्ही फोटो शेअर करत पबने लिहिलं की, हे १२ जण दुपारी २ ते ४ वाजण्याच्या सुमारास आमच्याकडे आले. त्यांनी भोजन केलं आणि पैसे न देताच पसार झाले. आता आम्ही त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आता यापैकी कुणी तुम्हाला कुठे दिसले किंवा त्यांची काही माहिती मिळाली तर आमच्याशी संपर्क साधा, असं आवाहन, पबने केलं आहे. या कुटुंबाची माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल, तसेच त्यांना शोधणाऱ्यांना योग्य बक्षीस दिलं जाईल, असेही पबने सांगितले आहे.
दरम्यान, पुढच्याच पोस्टमध्ये पबने सांगितलं आहे की, या लोकांची माहिती आणि नावं समजली आहेत. आम्ही त्यांना उद्यापर्यंत आपणहून समोर येण्याची वेळ देण्यात आली आहे. अन्य़था त्यांना थेट पोलिसांच्या स्वाधीन केलं जाईल. तसेच सोशल मीडियावरही त्यांच्या माहिती जाहीर केली जाईल, असा इशारा पबने दिला आहे.