सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद सध्या कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत आहेत. मध्यंतरी त्यांची पत्नी अस्मा ही त्यांना सोडून मुलांसह ब्रिटनमध्ये जाण्याच्या चर्चेनं माध्यमांचे रकाने आणि सोशल मीडिया ओसंडून वाहत होतं. आता नव्याच कारणानं ते पुन्हा चर्चेत आहेत. गेली तब्बल २४ वर्षे बशर अल असद यांनी सीरियाची सत्ता उपभोगली, पण बंडखोरांनी गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२४मध्ये त्यांची सत्ता उलथून लावली आणि बशर यांना रशियामध्ये आश्रय घ्यावा लागला.
इथंपर्यंत ठीक होतं, पण ही कहाणी इथेच संपलेली नाही. ५९ वर्षांचे बशर यांच्या आयुष्याचं दुसरं दुखरं पर्व आता सुरू झालं आहे. रशियात त्यांना आज आश्रितासारखं राहावं लागत आहे. त्यांचा पूर्वीचा तो सगळा तामझाम आता लयाला गेला आहे. त्यांच्याकडे पाहण्याच्या नजरा बदलल्या आहेत. एवढंच नाही, रशियात आल्यानंतर ते गंभीर आजारी पडले. त्यांना खूप मोठ्या प्रमाणात सर्दी-खोकला झाला, पण हा खोकला साधा नव्हता. खोकल्याची उबळ आली की त्यांना श्वासोच्छ्वास घ्यायलाही त्रास व्हायचा. त्यांच्या या आजारामुळे डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याची कसून तपासणी केली. त्यातून एक वेगळीच बाब समोर आली आहे.
डॉक्टरांनी सांगितलं, त्यांच्या शरीरात विष पसरलं आहे आणि त्यांच्यावर विषप्रयोग झाला असण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीनं उपचार केले. त्यांच्या शरीरातील विष बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांची तब्येत आता सुधारते आहे, पण त्यामुळे मुख्य प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे त्यांच्यावर विषप्रयोग कोणी, का केला असावा आणि तेही रशियात? त्यावरून बरेच तर्कविर्तक रंगवले जात आहेत.
बशर यांना नेमका कुणी आणि कसा विषप्रयोग केला, याची चौकशी आता रशियन अधिकारी करीत आहेत, पण रशियन अधिकाऱ्यांनीच किंवा रशियन सरकारनंच तर हा विषप्रयोग केला नाही ना, याविषयीही सोशल मीडियावर शंका व्यक्त केल्या जात आहेत. अर्थात यासंदर्भात रशियन सरकार किंवा अधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या अटकळीला दुजोराही दिलेला नाही किंवा त्याचा इन्कारही केलेला नाही. त्यामुळे बशर यांच्या विषप्रयोगाविषयीचं संशयाचं धुकं आणखीच गडद झालं आहे. बशर रशियात तरी सुरक्षित आहेत की नाहीत, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे.
बशर यांना सत्तेतून खाली खेचल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या परिवारानं रशियाकडे आश्रय मागितला. रशियानंही बशर यांना आश्रय दिला. त्यानंतर एका अपार्टमेंटमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली गेली.
बशर यांच्याआधी त्यांच्या पत्नीवरून राजकारण आणि सोशल मीडिया गाजत होतं. बशर यांची पत्नी अस्मा यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती २०१९ मध्ये उघड झाली होती. त्यांच्या वाचण्याच्या शक्यता केवळ पन्नास टक्के आहेत, अशी माहितीही डॉक्टरांच्या हवाल्यानं दिली जात होती. सध्या मॉस्कोमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचार घेतल्यानंतर आपण आता कॅन्सरमुक्त आहोत असं अस्मा यांनी स्वत:च जाहीर केलं होतं. मात्र, एकांतवासात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं कळतं. मूळच्या ब्रिटिश असलेल्या अस्मा यांच्याकडे ब्रिटन आणि सीरिया अशा दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे. काही दिवसांपूर्वीच त्या ब्रिटनला परत जाणार अशी अटकळ बांधली जात होती, पण त्यांच्या पासपोर्टची व्हॅलिडिटी संपल्यानं त्यांना ब्रिटनला जाता आलं नाही, असं म्हटलं जात आहे.
बशर आणि अस्मा यांचा विवाह डिसेंबर २००० मध्ये झाला होता. त्यांना तीन मुलं आहेत. हाफिज, जीन आणि करीम अशी त्यांची नावं आहेत. अस्मा आणि बशर यांचं पटत नाही, अस्मा आपल्या नवऱ्यावर नाराज आहेत, त्यांना एकमेकांपासून वेगळं व्हायचं आहे, त्यामुळेच त्यांना आपल्या मुलांना घेऊन पुन्हा लंडनला जायचं आहे, अशा बातम्या काही दिवसांपूर्वी झळकल्या होत्या. एवढंच नाही, अस्मा यांनी बशर यांच्याविरुद्ध घटस्फाेटाचा दावाही दाखल केल्याचं म्हटलं जात आहे. एकमेकांशी पटत नसल्यानंच अस्मा यांनी रशिया सोडण्यासाठी रशियन सरकारकडे विशेष अनुमती मागितली आहे. रशियन अधिकाऱ्यांकडे त्यांचा हा अर्ज प्रलंबित आहे. क्रेमलिननं मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.
२७० किलो सोनं, २ बिलियन डॉलर्स!
बंडखोरांनी ८ डिसेंबर २०२४ रोजी सीरियाची राजधानी दमिश्कवर कब्जा केला. त्याच्या काही काळ आधीच बशर देश सोडून पळाले आणि त्यांनी रशियात आसरा घेतला. त्याआधी एक चतुराई मात्र त्यांनी केली. आपल्याला इथून पळावं लागेल याचा अंदाज त्यांना आधीच आला होता. त्यामुळे तिथून पळण्याआधीच २७० किलो सोनं आणि दोन बिलियन डॉलर्स (सुमारे १७ हजार कोटी रुपये) त्यांनी मॉस्कोला आधीच पाठवून दिले होते, असं समजतं.