ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. २१ - चीनमधील शास्त्रज्ञांनी एक कृत्रिम सूर्य बनवण्यात यश संपादन केले असून हा सूर्य पाच कोटी डिग्रीहून अधिक उर्जा उत्सर्जित करू शकतो. ' दि एक्सपेरिमेंटल अॅडव्हान्स्ड सुपरकंडक्टिंग टोकमाक ( EAST)' असे नाव त्याला देण्यात आले असून ' हेफैई इन्स्टिट्यूट ऑफ फिजीकल सायन्स'ने हा कृत्रिम सूर्य बनवल्याचे पीपल्स डेलीने म्हटले आहे.
हा कृत्रिम सूर्य 'नियंत्रित थर्मोन्युक्लिअर फ्युजन'च्या माध्यमातून अपरिमित अमर्याद शुद्ध उर्जा निर्माण करू शकतो, असे चायना अॅकॅडमी ऑफ इंजिनीआरिंग फिजीक्समधील संशोधक क्झु जिआन यांनी सांगितले.
या सूर्यातील उष्णता व प्रकाश ड्युटेरियम व टिट्रियम नावाच्या दोन हायड्रोजन्समधून येते. सूर्याच्या एक हीलियम परमाणु फ्युजन प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात उर्जा बाहेर पडते, असेही ते म्हणाले. कृत्रिम सूर्यामध्येही हीच प्रक्रिया होत असल्याचे त्यांनी नमूद केले.