सॅन फ्रान्सिस्को : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर काही वेळाने अमेरिकी संसदेच्या एका समितीने अरुणाचल प्रदेशलाभारताचा अविभाज्य भाग घोषित करणारा ठराव मंजूर केला आहे. खासदार जेफ मर्कले, बिल हेगेर्टी, टीम काईने आणि ख्रिस वान हॉलेन यांनी गुरुवारी हा प्रस्ताव मांडला होता.
अमेरिका मॅकमोहन रेषेला पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (पीआरसी) आणि भारतीय राज्य अरुणाचल प्रदेश यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता देतो. यावर या प्रस्तावाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे अरुणाचल प्रदेशचा बहुतांश भाग आपला असल्याचा चीनचा दावा खाेटा ठरतो, असे माध्यमांना दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. हा प्रस्ताव आता सिनेटसमोर मतदानासाठी ठेवण्यात येणार आहे.
पुन्हा शिक्कामोर्तब“समितीने हा ठराव मंजूर केल्याने, अमेरिका अरुणाचल प्रदेशला चीनचा नव्हे, तर भारताचा अविभाज्य भाग मानतो, यावर पुन्हा शिक्कामोर्तब होते,” असे मर्कले म्हणाले. खासदार काईने म्हणाले, “भारत-चीनमध्ये सीमेवर तणाव वाढत आहे. अशा परिस्थितीत स्वतंत्र हिंद-प्रशांतला पाठिंबा देऊन लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी अमेरिकेला खंबीरपणे उभे राहावे लागेल.”