बीजिंग : अरुणाचल प्रदेशवरून भारताशी मतभेद हे एक कटू सत्य असल्याचे गुरुवारी सांगून चीनने सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा उकरून काढला. त्याचबरोबर या मुद्यावर तोडग्याकरिता संयुक्तपणे पोषक वातावरण निर्माण करायला हवे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांशी सहमत असल्याची पुश्तीही जोडली. भारताने अरुणाचल प्रदेशातील सशस्त्र दल विषेधाधिकार कायद्याची (आफ्सपा) मुदत वाढविल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग म्हणाल्या की, ‘चीन- भारत सीमा मुद्यावर चीनने आपली भूमिका नेहमी स्पष्ट मांडली.दोन्ही पक्षांनी सीमा प्रश्नावर चर्चेसाठी पोषक वातावरण निर्माण करायला हवे, अशी आमची भूमिका आहे.’’ अरुणाचलची १,१२७ कि.मी. लांबीची सीमा चीनलगत तर ५२० कि.मी. लांबीची सीमा म्यानमारला लागून आहे. चीन अरुणाचल हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे सांगत त्यावर दावा करतो. (वृत्तसंस्था)
‘अरुणाचल’वरून भारताशी मतभेद हे ‘कटू सत्य’-चीन
By admin | Published: April 10, 2015 1:19 AM