बॉलिवूडच्या किंग खानचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यासह बॉलिवूडच्या एका गटाने एनसीबीवर संशय व्यक्त करत मुद्दामहून त्याला अडकविल्याचे आरोप केले आहेत. आता पाकिस्तानने देखील शाहरुखला तिकडे येण्यास सांगितले आहे.
तीन ऑक्टोबरच्या रात्री शाहरुख खानचा (ShahRukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan khan) एनसीबीने मुंबई क्रूझ रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतले होते. आर्यनकडे ड्रग्ज सापडले नसले तरी त्याच्या मोबाईलमध्ये याचे संभाषण सापडले आहे. यामुळे एनसीबी आर्यन खानला सोडण्याच्या मुडमध्ये नाहीय. तर शाहरुख आर्यन खानला जामिन मिळावा म्हणून जंग जंग पछाडत आहे. हा मुद्दा भारतातच नाही तर पाकिस्तानातही गाजत आहे.
पाकिस्तानचे (Pakistan) सर्व सेलिब्रेटी, अभिनेते आर्यन खान प्रकरणी शाहरुख खानचे समर्थन करत आहेत. आता पाकिस्तानचा प्रसिद्ध अँकर वकार जाकाने शाहरुखच्या समर्थनाथ ट्विट केले आहे. ''शाहरुख खान सर, तुम्ही भारत सोडा आणि तुमच्या कुटुंबासोबत पाकिस्तानात येऊन स्थिरस्थावर व्हा. नरेंद्र मोदी सरकार तुमच्या कुटुंबासोबत जे करत आहे, ते एकदम चुकीचे आहे. मी शाहरुख खानसोबत उभा आहे.'' या ट्विटनंतर वकार ट्रोलदेखील झाला.
वकारच्या या ट्विटवरून काही लोक समर्थन करत आहेत. तर काही त्याची खिल्ली उडवत आहेत. एका युजरने म्हटले की, शाहरुखची पत्नी हिंदू आहे आणि ते हिंदुंचे सण देखील साजरे करतात. जो व्यक्ती पत्नीच्या धर्माचा देखील सन्मान करतो तो एक खरा माणूस आहे. तर काही युजरनी वकारला पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीच्या बेकार परिस्थितीची जाणीव करून दिली.
फुकरान नावाच्या एका युजरने म्हटले की, इथे त्याला सिनेमे मिळणार नाहीत. आपल्या इंडस्ट्रीची हालत तुम्हाला माहितीच आहे. बरबाद झालेली आहे. कंटेंटची तर अपेक्षाच करायला नको. सादने म्हटले की, शाहरुख खानला फिल्म मिळणे तर दूरची गोष्ट, सारे प्रोड्युसर्स जरी एकत्र आले तरी त्याची फी देऊ शकणार नाहीत.