रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज नववा दिवस असून ही लढाई आता दिवसेंदिवस वाढत आहे. रशियन सैन्याने गेल्या २४ तासांत खार्किव, चेर्निहाइव्ह, बोरोदयांका, मारियुपोल येथे जोरदार बॉम्बहल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये अवघ्या २४ तासांत जवळपास २२ जणांचा मृत्यू झाला आहे. सतत सुरु असणाऱ्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील नागरिकांची चिंता वाढली आहे.
युक्रेन आणि रशियन सैन्यामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान संयुक्त राष्ट्राने धक्कादायक आकडेवारी सादर केली आहे. गेल्या एका आठवड्यात युक्रेनमधून १.२ दशलक्ष लोकांनी पलायन केले आहे. या लोकांनी युक्रेन सोडून शेजारील देशांमध्ये आश्रय घेतल्याची माहिती समोर आली आहे. रशियन फौजांनी युक्रेनमधील दुसऱ्या मोठया शहरावरील आणि सामरिकदृष्टया महत्त्वाच्या दोन बंदरांवरील हल्ले वाढवले आहेत. निर्वासितांची ही संख्या लक्षात घेता, युक्रेनच्या लोकसंख्येपैकी २ टक्क्यांहून अधिक लोकांना गेल्या सात दिवसांत देशाबाहेर पडणे भाग पडले आहे.
रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यापासून जागतिक पटलावर वातावरण तणावपूर्ण झालं आहे. अनेक देशांनी रशियाविरोधात युक्रेनला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सभेमध्ये १४१ देशांनी युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात रशियाविरोधी वातावरण तयार होत असून सर्वच देशांचे प्रमुख पुतिन यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की युक्रेनसोडून पोलंडमध्ये पोहचल्याचा दावा रशियन मीडियाने केला आहे. अलीकडेच झेलेन्स्कीने युद्धाच्या काळात देश सोडल्याची बातमी आली होती. अशा परिस्थितीत आता वोलोदिमीर जेलेन्स्की पोलंडमध्ये असल्याची माहिती रशियन मीडियाने दिली आहे.
पुतिन यांची इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा-
युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध दिवसेंदिवस वाढत जात आहे. याचपार्श्वभूमीवर आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी ९० मिनिटे फोनवर संवाद साधला. फ्रान्स रशियन लोकांच्या पाठीशी उभा आहे असून त्यांना हे युद्ध नको आहे, असं मॅक्रॉन यांनी यावेळी सांगितलं. मात्र चर्चेदरम्यान पुतीन यांनी आमचं ध्येय साध्य होईपर्यंत युक्रेनविरोधातील युद्ध आम्ही सुरुच ठेवणार असल्याचं त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितलं.