अमेरिकेच्या टेनेसी राज्यातलं फ्रँकलिन हे शहर. गेल्या दोन दशकांपासून तिथं राहणारा कॅमिलो हर्टाडो कॅम्पोस हा ६३ वर्षीय फुटबॉल कोच. त्यानं त्याच्या तरुणपणी तर फुटबॉलमध्ये चांगलं नाव कमावलं आहेच; पण त्याहीपेक्षा फुटबॉल कोच म्हणून तो खूप प्रसिद्ध आहे. आजवर त्यानं शेकडो फुटबॉलपटू घडवले आहेत. त्यामुळे कॅमिलोनंच आपल्या मुलांना फुटबॉलचे प्राथमिक धडे द्यावेत यासाठी पालकही आसुसलेले असतात. त्यासाठी बऱ्याचदा ‘फिल्डिंग’ लावली जाते, ओळखीपाळखी काढल्या जातात आणि वशिल्यानं का होईना, आपल्या मुलांना त्याच्या अकॅडमीमध्ये प्रवेश मिळाला की पालक आणि मुलं धन्य धन्य होतात..!
आपल्याकडे ‘चांगली’ मुलं यावीत यासाठी कॅमिलोही कायम झपाटलेला असतो आणि ‘टॅलेण्ट’ शोधण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात तो कायम फिरत असतो. एखादा जरी चांगला मुलगा त्याला ‘सापडला’ आणि त्याच्यात पोटेन्शिअल आहे, असं त्याला कळलं की लगेच तो मैदानावर त्याचे धडे गिरवतो आणि त्याला फुटबॉलमध्ये तयार करतो. कॅमिलोची ही ख्याती सगळीकडंच पसरली आहे, त्यामुळे त्याचं चांगलं नावही आहे. ज्या मुलांमध्ये खरोखर गट्स आहेत त्यांच्यासाठी तो काहीही करायला तयार असतो, फुटबॉलमध्ये त्यांचं करिअर व्हावं यासाठी पालक आणि मुलांपेक्षा तोच जास्त आग्रही असतो. त्यामुळे प्रत्यक्ष मैदानावर तर तो फुटबॉलच्या ट्रिक्स आणि बारकावे मुलांना सांगत असतोच; पण सगळ्याच गोष्टी मैदानावर सांगता येत नाहीत, या खेळामागची मानसिकता कशी असली पाहिजे, समोरच्याच्या मनात काय चाललं आहे, हे कसं ओळखायचं, त्यासाठीची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, कोणते डावपेच कधी, कसे आखले पाहिजेत यासाठी युक्तीच्या चार गोष्टीही तो सांगत असतो. त्यासाठी तो बऱ्याचदा आपल्या विद्यार्थ्यांना घरीही बोलवत असतो. त्याच्यावरच्या विश्वासामुळे पालकही नि:संकोचपणे मुलांना त्याच्या घरी पाठवत असतात.
हाच कॅमिलो एकदा फ्रँकलिनच्या एका आलिशान हॉटेलमध्ये जेवणासाठी जातो. फार घाई असल्यामुळे भराभर जेवण उरकतो आणि बिल देऊन घाईघाईतच तिथून निघतो. कारण घरी त्याचे स्टुडंट; फुटबॉलचे विद्यार्थी त्याची वाट पाहत असतात; पण या घाईत तो हॉटेलमध्येच आपला मोबाइल विसरतो.
कॅमिलो हॉटेलातून बाहेर पडल्यावर तिथल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येतं, त्याचा मोबाइल तो तिथेच विसरून गेला आहे. मोबाइलही अत्यंत महागडा आहे. आता काय करायचं? हॉटेल व्यवस्थापनापुढे प्रश्न पडतो. आजूबाजूला, हॉटेलमध्ये आलेल्या आणि कॅमिलो ज्यावेळी हॉटेलातून बाहेर पडला, त्यावेळी तिथे हजर असलेल्या इतर खवय्यांकडेही ते चौकशी करतात; पण त्याच्या ओळखीचा काहीही धागादोरा मिळत नाही. त्याचा मोबाइल अनलॉक करायचा आणि त्यातून मिळालेल्या माहितीनंतर मोबाइलच्या मालकाचा तपास लावायचा असा निर्णय हॉटेल व्यवव्स्थापनानं घेतला; पण या फोनची ‘सिक्युरिटी’ही तेवढीच कडक! तो फोन काही त्यांना अनलॉक करता येत नाही. शेवटी तज्ज्ञांच्या मदतीनं एकदाचा हा फोन अनलॉक होतो आणि सर्वांना हुश्श होतं. त्यांची इतक्या तासांची मेहनत फळाला आलेली असते; पण मोबाइल अनलॉक केल्याबरोबर हॉटेल व्यवस्थापनानं काय करावं? ते पोलिसांना फोन करतात. पोलिसही लगोलग येतात, कॅमिलोचा शोध घेतात आणि त्याच्या हातात बेड्या ठोकतात!
कहानी में इतना ट्विस्ट? जो कॅमिलो ‘हीरो’ आहे, फुटबॉलमध्ये इतक्या मुलांना घडवतोय, मुलं आणि पालकांच्याही गळ्यातला तो ताईत आहे, तरीही त्याला अचानक अटक कशी काय? त्याच्या अटकेशी हॉटेलचा किंवा मोबाइलचा काय संबंध..?
कॅमिलोचा कॉन्टॅक्ट शोधून काढण्यासाठी म्हणून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा मोबाइल अनलॉक केल्याबरोबर त्यांना काय दिसतं? तर असे अनेक व्हिडीओ; ज्यात बेशुद्ध पडलेल्या आपल्या लहान लहान विद्यार्थी खेळाडूंशी कॅमिलो अनैसर्गिक कृत्य करतो आहे! या घटनेची सध्या संपूर्ण अमेरिकेतच नाही, तर अख्ख्या जगात चर्चा होते आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं जातंय, तर कॅमिलोला ‘फटके’ मारले जाताहेत; पण त्याहीपेक्षा कॅमिलोच्या या हीन कृत्याची भणक कोणालाच कशी लागली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मोबाइल मिळाला नसता तर..?
पोलिसांना चौकशीत आढळून आलं, कॅमिलोच्या मोबाइलमध्ये जे व्हिडीओ आढळून आले, प्रत्यक्षात त्याच्या किती तरी जास्त मुलांवर त्यानं बेशुद्ध करून अत्याचार केले आहेत. कॅमिलोचा मोबाइल हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना मिळाला नसता, तर अजूनही किती तरी लहान मुलांचं आयुष्य त्यानं बर्बाद केलं असतं, याला त्यांनीही दुजोरा दिला आहे.