मॉस्को : रशियाने अंतराळातील उपग्रह नेस्तनाबूत करणाऱ्या मिसाईलचे (ASAT) परिक्षण केले आहे. या चाचणीवेळी रशियाने आपल्याच एक जुन्या कॉसमॉस-1408 या उपग्रहावर मिसाईल डागले आहे. या उपग्रहाच्या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणावर अवशेष फेकले गेले असून यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेल्या अंतराळवीरांच्या जिवावर बेतले होते. त्यांना बचावासाठी सोमवारी ट्रान्सपोर्ट स्पेसक्राफ्टमध्ये लपावे लागले होते. या प्रकारामुळे अमेरिका रशियावर संतापला आहे.
रशियाने ही चाचणी केव्हा केली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, याचे पहिले वृत्त सोमवारी आले. रशियाने देखील याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. सोमवारी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या अगदी जवळून या सॅटेलाईटचे अवशेष गेले. या साऱ्या प्रकारावर लक्ष ठेवून असलेल्या तज्ज्ञांनी सांगितले की दर 90 मिनिटांनी रशियन सॅटेलाईटचे अवशेष स्पेस स्टेशनकडून गेले.
रशियन स्पेस एजन्सी रोसकोसमोस ने याची पुष्टी केली की स्पेस स्टेशनच्या बाजुने अवशेष गेले आहेत. नासाचे अंतराळवीर मार्क वंदे हेई यांनी नासाच्या मिशन कंट्रोलमधून सांगितले की, मूर्खपणाने भरलेल्या परंतू पूर्णपणे समन्वयाच्या दिवसासाठी धन्यवाद. तुम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी जी माहिती दिली, त्याच्या प्रयत्नांची आम्ही स्तुती करत आहोत.
दुसरीकडे रशियाच्या या कृत्यावर अमेरिका भडकला आहे. अमेरिकेच्या स्पेस कमांडने म्हटले की, अंतराळात अवशेष निर्माण झाल्याची माहिती मिळाली आहे. हे अवशेष रशियाच्या अँटी सॅटेलाईट वेपनच्या वापरामुळे तयार झाले आहेत. आम्ही या अवशेषाच्या ठिकाण्याची माहिती घेत राहू आणि जे देश अंतराळात त्यांचे उपग्रह पाठवितात त्यांना सूचना देत राहू.
हा उपग्रह आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेनच्या थोड्या उंचीवर होता. यामुळे स्पेस स्टेशनला अवशेषामुळे धोका उत्पन्न झाला. पुढेही हा धोका राहणार आहे. अंतराळवीरांना या धोक्याची कल्पना देण्यात आली होती. यामुळेच हे अंतराळवीर आपत्कालीन परिस्थितीत पृथ्वीवर येण्यासाठीच्या यानामध्ये बसले होते.