दमास्कस : सिरियामधील पामिरा या प्राचीन शहराचे अवशेष जपणाऱ्या पुरातत्वशास्त्रज्ञ खालेद असद यांची इसिस (इस्लामिक स्टेटस आॅफ इराक अँड सिरिया)ने हत्या केली आहे. जवळजवळ पाच दशके येथील प्राचीन अवशेषांचे जतन असद यांनी केले होते. ज्या पामिराच्या अवशेषांची काळजी असद यांनी घेतली होती तेथेच त्यांना मारून त्यांचा मृतदेह रोमन साम्राज्याच्या वैभवाची साक्ष सांगणाऱ्या खांबांना लटकविण्यात आला. काही महिन्यांपूर्वी पामिरा या सिरियामध्ये मध्यवर्ती असणाऱ्या शहराचा ताबा इसिसने घेतला होता. त्यानंतर पुरातत्वशास्त्रज्ञ असद यांना पकडून त्यांच्याकडून शहरातील कथित खजिन्याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न इसिसने केला. मात्र त्यांना त्यामध्ये अपेक्षित यश आले नाही. कदाचित याच रागापोटी त्यांची हत्या करण्यात आली असावी. लंडनस्थित सिरियन मानवी अधिकारांबाबत कार्य करणाऱ्या संस्थेने सांगितल्यानुसार खालेद असद यांनी १९६० पासून ज्या पुराणवस्तू संग्रहालयाचे कामकाज पाहिले त्याच्या समोरील चौकातच त्यांना फासावर लटकविण्यात आले. असद यांनी पामिरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक ग्रंथ प्रकाशित केले होते. पामिरा हे रेशीम मार्गावरील महत्वाचे स्थान होते, त्यामुळे त्यांनी पामिरावर विशेष संशोधन करून तेथील अवशेषांचे जतन केले होते. मात्र वयाच्या ८१ वर्षांपर्यंत पामिरासाठी काम करणाऱ्या खालेद असद यांना इसिसने अत्यंत क्रूरपणे ठार मारले. (वृत्तसंस्था)
पुरातत्वशास्त्रज्ञ असद यांची हत्या
By admin | Published: August 19, 2015 11:04 PM