इस्राइल आणि हिजबुल्लाह यांच्यात सुरू असलेला संघर्ष केवळ युद्धाच्या मैदानातच नाही तर सोशल मीडियावरूनही खेळला जात आहे. दरम्यान, इस्राइलचे लष्करप्रमुख हरजी हलावी यांची हत्या करण्यात आल्याचा दावा इराण समर्थकांकडून करण्यात आल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तसेच इराण आणि पॅलेस्टाइनच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या चर्चांदरम्यान, सत्य परिस्थिती मात्र वेगळीच असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत एक्सवर एका युझरने लिहिलं की, प्राथमिक माहितीनुसार इस्राइलच्या चीफ ऑफ आर्मी स्टाफची हत्या झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. याबाबत एक फोटोही व्हायरल होत असून, त्यामध्ये इस्राइलचे आर्मी चीफ हरजी हलावी यांच्याकडून जबरदस्तीने राजीनामा घेण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये आणखी काही लोक त्यांच्यासोबत बसलेले दिसत आहेत. तसेच इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हेही संतप्त झालेले दिसत आहेत.
सोमाली इन्स्टिट्युट ऑफ चायनिज स्टडीज अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात म्हटलंय की, आनंदोत्सव साजरा करा. हिजबुल्लाहने ड्रोन हल्ला करून इस्राइल लष्कराच्या चीफ ऑफ आर्मी स्टाफला ठार मारले आहे. ते इस्राइलच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे प्रमुख व्यक्ती होते. ते गोलानी ब्रिगेड बेसवर असताना त्यांच्यावर हिजबुल्लाहने हल्ला केला आणि ठार मारले.
मात्र सोशल मीडियावरील चर्चांदरम्यान, सत्य परिस्थिती मात्र् वेगळीच दिसत आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा खऱ्या नसल्याचे समोर आले आहे. कसेत इस्राइलचे लष्करप्रमुख हे अगदी सुरक्षित आहेत. सोमवारी ते हिजबुल्लाहने हल्ला केला त्या तळावर गेले होते. तसेच या हल्ल्याची किंमत हिजबुल्लाहला मोजावी लागेल, अशी शपथ त्यांनी घेतली आहे. त्यांचा आजचाच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये ते हैफा येथील एअरबेसमध्ये फिरताना दिसत आहेत. याच ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र हे दावे खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.