इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टला अपघात झाल्याचे वृत्त आल्यापासून आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडालेली आहे. हेलिकॉप्टर अपघाताचं वृत्त आल्यापासून रईसी यांच्याशी कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान, या अपघाताच्या वृत्तानंतर अमेरिका सतर्क झाली असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आपली सुट्टी स्थगित करून आणीबाणीच्या बैठकीसाठी व्हाई हाऊस येथे परतले आहेत. दरम्यान, इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांची हत्या झाली असण्याचा संशय अमेरिकेने व्यक्त केला आहे.
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांना घेऊन जात असलेलं एक हेलिकॉप्टर रविवारी पर्वतीय प्रदेशातून दाट धुक्यामधून मार्ग काढत असताना अपघातग्रस्त झालं होतं. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसोबत एक तातडीची बैठक घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. इराणमधील वृत्तसंस्थांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार इब्राहिम रईसी यांच्यासोबच या हेलिकॉप्टरमध्ये इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर-अब्दुल्लाहियन आणि इतर अधिकारी उपस्थित होते. दुर्घटनेनंतर रईसी आणि अमीर अब्दुल्लाहिन यांच्या जीविताबाबत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती रईसी यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच या कठीण प्रसंगी इराणच्या जनतेसोबत आपण उभे असल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इराणच्या राष्ट्रपतींच्या ताफ्यामध्ये तीन हेलिकॉप्टर होते. त्यामधील दोन आपल्या निर्धारित ठिकाणी सुरक्षितरीत्या पोहोचले. मात्र एक हेलिकॉप्टर हे अपघातग्रस्त झालं. इराणच्या सरकारी टीव्हीने सांगितले की, ही दुर्घटना इराणच्या राजधानीपासून सुमारे ६०० किमी दूर अंतरावर असलेल्या अझरबैजान या देशाच्या सीमेवर असलेल्या जोल्फा या शहराजवळ घडली.
रईसी हे रविवारी अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलियेव यांच्यासोबत एका धरणाचं उद्घाटन करण्यासाठी अझरबैजानमध्ये गेले होते. दोन्ही देशांनी असार नदीवर बांधलेले हे तिसरे धरण आहे. इराणचे ६३ वर्षीय राष्ट्रपती रईसी हे कट्टरतावादी असून, त्यांनी इराणच्या न्यायपालिकेचं नेतृत्वही केलेलं आहे. रईसी हे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचे शिष्य मानले जातात.