लंडन/नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानं जगाची चिंता वाढली आहे. नवा स्ट्रेन ७० टक्के अधिक वेगानं पसरत असल्यानं सर्वच देशांनी सावध पवित्रा घेतला आहे. भारतासह युरोपमधील जवळपास सर्वच देशांनी ब्रिटनसोबत सुरू असलेली हवाई वाहतूक रोखली आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रिटन सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमधील नियामक संस्था मेडिसीन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीनं (एमएचआरए) ऑक्सफर्ड (Oxford) ऍस्ट्रा झेनेकाच्या (Astra Zeneca) लसीच्या वापरास परवानगी दिली आहे. भारतात ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाच्या लसीची चाचणी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं केली आहे. ब्रिटनच्या नियामक यंत्रणेकडून ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर भारतात या लसीच्या वापरास मंजुरी देण्याचा विचार मोदी सरकारकडून सुरू आहे. आता ब्रिटननं ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाच्या लसीच्या वापरास परवानगी दिल्यानंतर केंद्र सरकारदेखील लसीच्या वापरास मंजुरी देऊ शकतं.
CoronaVirus Vaccine: ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या वापरास परवानगी; ब्रिटन सरकारचा मोठा निर्णय
By कुणाल गवाणकर | Published: December 30, 2020 1:53 PM