ह्यूस्टन : ‘नासा’च्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी बोइंगचे स्टारलाइनर अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी (आयएसएस) यशस्वीरित्या जोडण्यात यश मिळवले आहे.
प्रवासात आलेल्या काही अडचणींवर मात करून त्यांनी हे शक्य करून दाखवले आहे. विल्यम्स (५८) यांनी बुधवारी तिसऱ्यांदा अंतराळात प्रवास केला आणि बोइंगच्या स्टारलाइनर अंतराळ यानाद्वारे ‘आयएसएस’वर पोहचलेले पहिले अंतराळवीर म्हणून विल्मोर यांच्यासह इतिहास रचला. विल्यम्स या चाचणी उड्डाणासाठी वैमानिक आहेत तर विल्मोर (६१) हे मोहिमेचे कमांडर आहेत.
प्रक्षेपणानंतर सुमारे २६ तासांनी गुरुवारी दुपारी १.३४ मिनिटांनी बोइंग स्टारलाइनर अंतराळ यान ‘आयएसएस’शी यशस्वीरित्या जोडले गेले, असे नासाने एका निवेदनात म्हटले आहे. विलियम्स यांनी मोहिमेदरम्यान कुटुंबीय आणि मित्रांचे पाठिंब्याबद्दल आभार मानले.
यापेक्षा चांगले काही असू शकत नाही...“आमचे येथे आणखी एक कुटुंब आहे, जे खूप छान आहे. आम्ही अंतराळात खूप आनंदी आहोत. यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही,” अशी प्रतिक्रिया सुनीता विल्यम्स यांनी व्यक्त केली आहे. ‘आयएसएस’च्या मार्गावर या दोन्ही अंतराळवीरांनी अनेक चाचण्या पूर्ण केल्या, ज्यात अंतराळात प्रथमच स्टारलाइनरचे ‘मानवी’ उड्डाण करणे समाविष्ट आहे.