खार्टूम/नवी : ‘आम्ही तेथे कोणत्याही क्षणी मारले गेलो असतो,’ अशी प्रतिक्रिया सुदानहून परतलेल्या चिमुरडीने व्यक्त केली खरी, पण तिच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्ट दिसत होती. आता मायदेशी परतल्यानंतर मात्र तिला दिलासा मिळेल. सुदानमधील गृहयुद्धादरम्यान ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत भारतीयांना बाहेर काढले जात आहे. बुधवारी उशिरा ३६७ नागरिकांची पहिली तुकडी जेद्दाह, सौदी अरेबिया येथून नवी दिल्ली विमानतळावर पोहोचली. आणखी ६१३ भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा म्हणाले की, आमच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवणे आणि त्यांना लवकरात लवकर भारतात आणणे हे आमचे ध्येय आहे. सुदानमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आम्ही प्रत्येक भारतीयाला तिथून बाहेर काढू. केंद्र सरकार या मोहिमेवर लक्ष ठेवून आहे.
कोण वाचणार माहीत नव्हते...सुदानहून आलेल्या ज्योती म्हणाल्या, ‘आमच्यापैकी कोण वाचणार हे आम्हाला माहीत नव्हते. बॉम्बने उडालेली घरे आम्ही पाहिली. सोबत्यांना बंदुकीचा धाक दाखवून बांधलेले पाहिले. आम्ही आमच्यासोबत पैसेही आणले नाहीत, कारण तेथील सैन्य लुटत होते. डोळ्यासमोर गोळीबार होत असल्याचे काही लोकांनी सांगितले. एका चिमुरडीने तर कोणत्याही क्षणी जीव गेला असता, असे सांगितले.