अमेरिकेतील ओहायोमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक्रोनमध्ये एका बर्थडे पार्टीदरम्यान २७ जणांना गोळ्या लागल्याचं सांगण्यात येत आहे. The Spectator Index ने आपल्या एक्स हँडलवर या घटनेची माहिती शेअर केली आहे.
बीएनओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, ओहायोतील एक्रोन, येथे एका ब्लॉक पार्टीत गोळीबार झाला. यामध्ये २७ जणांना गोळ्या लागल्या होत्या. त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
रविवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. एक्रोनमध्ये वाढदिवसाची मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टीदरम्यान एकामागून एक अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबाराचा आवाज जवळच्या घरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
२७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला
एक्रोन पोलिसांनी २७ जणांना गोळ्या लागल्याचं सांगितलं आहे. यापैकी २७ वर्षीय तरुणाला मृत घोषित करण्यात आलं. काही जखमींना खासगी वाहनातून रुग्णालयात नेऊन दाखल करण्यात आले, मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आलेली नाही.
WEWS चॅनलच्या एका फोटोग्राफरने सांगितलं की, पोलीस तपासात घटनास्थळावरून अनेक पुरावे मिळाले आहेत. घटनास्थळावरून एक बंदुकही जप्त करण्यात आली आहे, मात्र कोणालाही अटक करण्यात आली नाही.
पार्टीदरम्यान गोळीबार का झाला, याचे उत्तर अद्याप पोलिसांकडे नाही. या घटनेची कोणाला माहिती असेल त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असं आवाहन पोलिसांनी जनतेला केलं आहे. यासाठी पोलिसांनी फोन नंबरही जारी केला आहे.