खारकीव्हमध्ये रशियाची बाॅम्बफेक, ५०० ठार; १५ अधिकाऱ्यांवर कॅनडाचे प्रतिबंध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 09:08 AM2022-03-17T09:08:57+5:302022-03-17T09:10:02+5:30
अमेरिका युक्रेनला देणार ६,२०४ कोटी रुपयांची लष्करी मदत; १५ अधिकाऱ्यांवर कॅनडाचे प्रतिबंध
कीव्ह : युक्रेनचे दुसरे मोठे शहर खारकीव्हमध्ये रशियाने केलेल्या बाॅम्बफेकीत किमान ५०० नागरिक मारले गेले. शहरात तातडीच्या सेवा यंत्रणेने मृतांची ही संख्या सांगितली व ही संख्या वाढू शकते, असेही म्हटले. दुसरीकडे रशियन आक्रमणाला तोंड देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन युक्रेनला जवळपास ६,२०४ कोटी रुपयांची (८०० दशलक्ष डॉलर्स) लष्करी मदत देण्याची तयारी करीत आहेत.
कॅनडाच्या सरकारने आणखी १५ रशियन अधिकाऱ्यांवर गंभीर प्रतिबंध लागू केले आहेत. यात सरकार आणि सैन्य वर्गाच्या लोकांचा समावेश आहे. आतापर्यंत ५०० रशियन लोकांवर प्रतिबंध लागले आहेत. ब्रिटन ३७० हाय प्रोफाईल रशियन लोकांवर प्रतिबंध लागू करीत आहे.
युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियाने जोरदार बाॅम्बवर्षाव केला आणि मारिवूपोल या बंदर शहरावर नव्याने हल्ले केले. या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या अध्यक्षांनी अमेरिकेच्या काँग्रेसच्या नेत्यांना केलेल्या आवाहनात आणखी थेट मदत मागितली आहे. विदेशी नेत्याने अमेरिकन काँग्रेस नेत्यांना असे थेट आवाहन क्वचितच केले आहे.रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्याला आता तीन आठवडे झाले आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमायर झेलेन्स्की यांनी रशियन सरकारशी वाटाघाटीतून काही आशादायक निघेल, असे सूचित केले आहे.
देशाला व्हिडीओद्वारे केलेल्या भाषणात अध्यक्ष म्हणाले की, प्रयत्न अजूनही गरजेचे आहेत तसेच संयमही. कोणतेही युद्ध हे करारानंतर संपते. असंख्य युक्रेनचे नागरिक राहत्या ठिकाणांहून पळून जात आहेत व राजकीय पातळीवर युद्धाचा प्रश्न सोडविण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.रशियाने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह १३ अमेरिकन नेत्यांना आपल्या देशात येण्याची बंदी घातली आहे. त्यात परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन, संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन आणि माजी परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांचा समावेश आहे.
ज्येष्ठ व्हिडीओग्राफर आणि फॉक्स न्यूजचा पत्रकार कीव्हच्या बाहेरून झालेल्या माऱ्यात त्यांचे वाहन सापडल्यामुळे मरण पावले. पिएरे झारझेव्क्सी (५५) आणि ओलेकसँड्रा ‘साशा’ कुवशायनोवा हे साेमवारी होरेन्कात फॉक्स न्यूजचे बातमीदार बेंजामिन हॉल यांच्यासोबत प्रवास करीत असताना माऱ्यात सापडले. हॉल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.फॉक्स न्यूज मीडिया आणि बातमीदारासाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्यांना आजची ही दु:खद बातमी आहे, असे नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूझॅन स्कॉट यांनी मंगळवारी निवेदनात म्हटले.
युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि त्यांच्या राजवटीच्या युद्ध गुन्ह्यांच्या चौकशीची मागणी करणाऱा ठराव अमेरिकेच्या सिनेटने एकमताने संमत केला.सिनेटर लिंडसे ग्रॅहम म्हणाले की, मानवतेविरोधातील गुन्हे, हिंसाचार आणि युद्ध गुन्ह्यांचा सिनेट कठोर शब्दात निषेध करीत आहे. पुतिन यांच्या सांगण्यावरून रशियाचे लष्कर हे गुन्हे करीत आहे. त्यामुळे पुतिन, त्यांची सुरक्षा परिषद आणि लष्करी नेत्यांची युद्ध गुन्ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयांकडून चौकशी व्हायला हवी. या अत्याचारांचा युद्ध गुन्हे म्हणून तपास झाला पाहिजे, असे सिनेट मेजॉरिटी नेते चक शुमेर म्हणाले.