बीजिंग/कुनमिंग: चीनच्या नैऋत्य भागात असलेल्या पर्वतीय युनान प्रांतात सोमवारी झालेल्या भूस्खलनात किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून ३९ जण बेपत्ता आहेत. सरकारी वृत्तसंस्था 'शिन्हुआ'च्या वृत्तानुसार, ही घटना बीजिंगमधील वेळेनुसार पहाटे ५ वाजून ५१ मिनिटांनी झाओतोंग शहरातील लियांगशुई गावात घडली.
या भूस्खलनामुळे ८ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून ३९ जण बेपत्ता आहेत. १८ घरांमध्ये राहणारे ४७ लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचे बचाव पथकाकडून सांगण्यात आले आहे. भूस्खलनग्रस्त भागातून ५०० हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, असे सरकारी टेलिव्हिजन 'सीसीटीव्ही'ने वृत्त दिले आहे.
प्रांतीय आयोगाने आपत्ती निवारणासाठी तिसऱ्या स्तरावरील आपत्कालीन प्रतिसाद कार्यान्वित केल्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात येते. अधिकृत माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भूस्खलनानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या शोधासाठी २०० हून अधिक बचाव कर्मचारी, ३३ अग्निशमन वाहने आणि १० लोडिंग मशीन तैनात करण्यात आल्या आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भूस्खलनानंतर सर्व लोकांचा शोध घेण्याचे आणि बचाव करण्याचे आदेश दिले आहेत. वृत्तानुसार, 'बचाव पथके तैनात करून बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. शक्यतो मृतांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत'', असे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले. याशिवाय, चीनचे पंतप्रधान ली क्विंग यांनीही लियांगशुईमध्ये मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, भूस्खलनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.