सागामिहारा (जपान) : जपानमध्ये गतिमंद शुश्रूषा गृहावर माजी कर्मचाऱ्याने केलेल्या चाकू हल्ल्यात १९ लोक ठार, तर २५ जण जखमी झाले. देशातील अलीकडच्या काही दशकांतील हे सर्वात मोठे भीषण हत्याकांड आहे. हत्याकांडानंतर हल्लेखोर पोलीस ठाण्यात आला आणि आपणच हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सर्व दिव्यांग लोक नष्ट व्हायला हवेत, असेही तो म्हणत होता. सातोशी युएमात्सू असे या आरोपीचे नाव असून, तो सागामिहारा शहरातील गतिमंद सुश्रूषागृहात फेब्रुवारीपर्यंत काम करीत होता. सात लाख लोकसंख्येचे सागामिहारा शहर जपानची राजधानी टोकियोच्या पश्चिमेला आहे. गतिमंद सुश्रूषागृहाने मला कामावरून कमी केले होते. त्यामुळे मी या केंद्राचा द्वेष करीत होतो, असे आरोपीने पोलिसांना सांगितले. युएमात्सूने नियोजनबद्ध पद्धतीने हत्याकांड घडवून आणले. त्याने पहाटे पहिल्या मजल्याची खिडकी फोडून आत प्रवेश केला आणि गतिमंदांवर चाकूने हल्ला चढविला. तत्पूर्वी, त्याने गतिमंदांची शुश्रूषा करणाऱ्यांना दोरखंडाने जखडून ठेवले होते. काहींच्या मानेवर अत्यंत खोल जखम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बचावलेल्या रुग्णांना मानसिक धक्का बसला असून, ते बोलू शकत नसल्याचे डॉक्टरांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनी एनएचकेला सांगितले. त्सुकुई यामायुरी - इन सेंटरसमोर रुग्णवाहिका, पोलीस वाहने आणि अग्निशमन वाहने रांगेत उभी होती. मृतांत नऊ पुरुष आणि दहा महिलांचा समावेश असून, ते १८ ते ७० वर्षे वयोगटातील आहेत. हल्ल्यात २५ जण जखमी झाले असून, त्यातील २० जणांची प्रकृती गंभीर आहे, असे सूत्रांनी सांगितले. हल्ल्याने आपणास धक्का बसल्याचे या शुश्रूषा गृहाजवळ राहणाऱ्या चिकारा इनाबायाशी यांनी सांगितले. सायरनच्या कर्णकर्कश आवाजामुळे सकाळी ३ वाजता मला जाग आली आणि त्यानंतर हा धक्कादायक घटनाक्रम समजला, असे त्या म्हणाल्या. (वृत्तसंस्था)जपान हादरलाविकसित देशांपैकी जपानमध्ये हिंसक गुन्ह्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तसेच शस्त्रानिशी हल्ला केला जाण्याचे प्रमाण तर नगण्यच म्हणता येईल. त्यामुळे १९ जणांचा बळी घेणाऱ्या या हत्याकांडाने जपान हादरून गेला आहे. १९३८ नंतरचे देशातील हे सर्वात भीषण हत्याकांड आहे. तेव्हा कुऱ्हाड, तलवार आणि बंदूकधारी हल्लेखोराने ३० जणांचा बळी घेतला होता.
जपानमध्ये दिव्यांग केंद्रावर हल्ला
By admin | Published: July 27, 2016 2:10 AM