इस्लामाबाद : पाकिस्तानमधील रावळपिंडी शहरात शंभर वर्ष पुरातन हिंदू मंदिरावर अज्ञात लोकांच्या समूहाने हल्ला केला. सध्या या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. (Attack on a hundred year old Mandir in Pakistan)पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ‘शहरातील पुरातन किल्ला परिसरात सायंकाळी साडेसहा वाजता १० ते १५ लोकांच्या समूहाने या पुरातन मंदिरावर हल्ला केला आहे. यामध्ये वरच्या मजल्यावरील मुख्य दरवाजा तथा अन्य दरवाजे तसेच पायऱ्यांची तोडफोड करण्यात आली. डॉन वर्तमानपत्राच्या बातमीनुसार, ईटीपीबीचे सुरक्षा अधिकारी सैय्यद रजा अब्बास जैदी यांनी रावळपिंडी येथील बन्नी पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीत मागील एक महिन्यापासून या मंदिराची डागडुजी व नूतनीकरण सुरू होते. सध्या मंदिरात कोणतेही धार्मिक कार्यक्रम नव्हते तसेच पूजेसाठी कोणतीच मूर्ती मंदिरात बसविण्यात आली नव्हती. मंदिराच्यासमोर काही अतिक्रमण केले होते, ते २४ मार्चला हटविले होते. अतिक्रमण करणाऱ्यांनी मंदिर परिसरात दुकाने आणि टपरी टाकून काही काळापासून येथे कब्जा केला होता. तेथील जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने नुकतेच सर्वप्रकारची अतिक्रमणे हटविली होती. मंदिर परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर नूतनीकरणाचे काम सुरू होते.
पाकिस्तानात शंभर वर्षे जुन्या मंदिरावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 4:28 AM