दोहा : ओमानच्या खाडीमध्ये दोन तेलवाहू जहाजांवर गुरुवारी पुन्हा संदिग्ध हल्ला झाला आहे. या जहाजांवरून सर्व खलाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून गेल्या आठवड्यातही जहाजांवर अशाचप्रकारे हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेने या हल्ल्याचा आरोप ईराणवर केला होता.
ही दोन्ही जहाजे संयुक्त अरब अमिरात (यूएई) ची राजधानी अबू धाबीच्या बंदरावरून रवाना झाली होती. वृत्तसंस्था सिन्हुआनुसार पाकिस्तान आणि ओमानच्या बंदरांना तेलवाहू जहाजांकडून संकटात असल्याचे कॉल मिळाले होते.
या जहाजामधील एक जहाज नॉर्वेच्या मालकीचे होते. तेथील कंपनी फ्रंटलाइनने सांगिले की फ्रंट अल्टेयरला ओमानच्या खाडीमध्ये आग लागली. हे जहाज मंगळवारी रात्री उशिरा युएईच्या बंदरावरून रवाना झाले होते. हे जहाज 30 जूनला तैवानच्या काऊशुंग बंदरावर पोहोचणार होते. या जहाजामध्ये मोठ्या प्रमाणावर तेल होते.
दुसरे जहाज पनामाचे झेंडे असलेले कोकुका करेजियस होते. या जहाजांवर कोणी हल्ला केला आणि का केला याबाबत खुलासा होऊ शकला नाही. गेल्या महिन्यातच 12 मे रोजी चार तेलवाहू जहाजांवर हल्ला झाला होता. फुजैरा येथील बंदरापासून काही अंतरावर समुद्रात उभ्या असलेल्या या जहाजांवर हल्ला झाला होता.