America Donald Trump News: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यातून ट्रम्प अगदी थोडक्यात बचावले. अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका प्रचारसभेला संबोधित करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोराने एकामागून एक गोळ्या झाडल्या. एक गोळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाच्या केवळ दोन सेंटीमीटर अंतरावरून गेल्याची माहिती देण्यात आली आहे.
एका प्रचारसभेत भाषण करत असताना अचानकपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात एक गोळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या अगदी बाजूने गेली. यानंतर ट्रम्प एकदम खाली बसले. पुन्हा उठून उभे राहिल्यानंतर कानाजवळून चेहऱ्यावर रक्त आल्याचे दिसत होते. ती गोळी कानाच्या आरपार गेल्यासारखे वाटले, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ घोषणबाजी
हल्ल्यानंतर काही वेळाने उठून उभे राहिल्यानंतर उपस्थितांनी ट्रम्प यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. काही वेळाने ट्रम्प यांचा ताफा कार्यक्रमस्थळावरून निघून गेला. काही रिपोर्टनुसार, स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रम्प घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर लगेचच पोलिसांनी मैदान रिकामे करण्यास सुरुवात केली. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. युनायटेड स्टेट्स सेक्रेटरियल सर्व्हिसेसचे संचालक किम्बर्ली चीटल, होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी अलेजांद्रो मेयोर्कस आणि व्हाईट हाऊस होमलँड सुरक्षा सल्लागार लिझ शेरवुड रँडल यांच्याकडून जो बायडन यांना घटनेविषयी सांगण्यात आले.
दरम्यान, ट्रम्पचे प्रवक्ते स्टीव्हन च्युंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, या घृणास्पद कृत्यादरम्यान त्यांच्या जलद कारवाईबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पोलिसांना धन्यवाद दिले. ट्रम्प यांची प्रकृती ठीक आहे. स्थानिक पातळीवर ट्रम्प यांची तपासणी केली जात आहे. सीक्रेट सर्व्हिसने एका निवेदनात म्हटले आहे की, माजी राष्ट्राध्यक्ष सुरक्षित आहेत. बटलर काउंटी डिस्ट्रिक्ट ॲटर्नी रिचर्ड गोल्डिंगर यांनी सांगितले की, संशयित हल्लेखोर प्रत्युत्तरात मारला गेला. तर, सभेतील एकाचा मृत्यू झाला.