रशिया-युक्रेन युद्धाचे (russia ukraine war) पडसाद आता शेजारील देशांमध्येही दिसू लागले आहेत. याचा सामना खुद्ध रशियाचे राजदूत Sergey Andreev यांना करावा लागला. पोलंडमध्ये काही लोकांनी त्यांच्यावर लाल रंगाने हल्ला केला. सोमवारी रशियाचा विजय दिवस होता. यानिमित्त Sergey Andreev हे दुसऱ्या महायुद्धात हौतात्म्य आलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले होते. याच वेळी रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला विरोध करणाऱ्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला.
या घटनेनंतर, पोलंडवर रशियन राजदूताला सुरक्षा पुरविण्यात अपयशी ठरल्याबद्दल टीकाही होत आहे. Sergey Andreev हे सोमवारी पोलंडच्या राजधानीत असलेल्या सोव्हियत सैनिकांच्या कब्रस्तानात पोहोचले होते. श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यानच त्यांच्यावर लाल पेंटने हल्ला करण्यात आला. याचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
आता रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त मारिया जखारोव्हा यांनी या घटनेचा विरोध केला आहे. तसेच, असे हल्ले करून रशियाला घाबरवले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
युद्ध योग्यच -दुसरीकडे रशियाच्या 77व्या विजय दिनानिमित्त (Victory day) मोठा कार्यक्रम पार पडला. यावेळी केलेल्या भाषणात राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनीही आपल्या भाषणाची सुरुवात युक्रेममधील काही भागांचा उल्लेख करत केली. यावेळी पुतिन यांनी डोनबास, खारकीव्ह आणि मारियूपोलचा उल्लेख केला. याच वेळी, आपण युक्रेनविरोधात केलेली कारवाई योग असल्याचेही पुतिन यांनी म्हटले आहे.