युक्रेनने रशियन नौदलाच्या एका मोठ्या तळावर भीषण हल्ला केला आहे. पाण्यातून वार करणाऱ्या ड्रोनने रशियाची दुसरी महत्वाची युद्धनौका बुडविली आहे. यामुळे रशियाला एकतर सर्व युद्धनौका परत बोलवाव्या लागण्याची किंवा त्यांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर सामग्री तैनात करण्याची वेळ आली आहे.
रशियन नौदलाचा क्रिमीयामध्ये एक मोठा नाविक तळ आहे. यावर मोठमोठ्या युद्धनौका तैनात आहेत. काही महिन्यांपूर्वी युक्रेनने रशियाची सर्वात शक्तीशाली एडमिरल मोस्कवा उध्वस्त केली होती. तिची जागा घेण्यासाठी आलेली रशियाची मिसाईल क्रूझ फ्रीगेट मकरोवचा शोध युक्रेनकडून सुरु होता, परंतू त्याला यश येत नव्हते. अखेर पाण्याखालून वार करणाऱ्या ड्रोनने ही युद्धनौका शोधली आणि तिच्यावर हल्ला चढविला.
रशियाच्या या तळावर एकामागोमाग एक असे अनेक जोरदार हल्ले झाले. यामागे ब्रिटनच्या तज्ज्ञांचा हात असल्याचा आरोप रशियाने केला आहे. सुमारे १५ हवेतील आणि पाण्यातील ड्रोननी हल्ला केल्याचा आरोप रशियाने केला आहे. काळ्या समुद्रातील सेवास्तोपोल या नाविक तळावर हा हल्ला झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा पाण्याखालील ड्रोन अलकायदा आणि यहुती विद्रोहींकडून वापरला जातो. युक्रेनक़डे एवढे शक्तीशाली नौदल नसताना देखील एवढा खतरनाक ड्रोन हाती लागल्याने रशियाचे धाबे दणाणले आहेत.
हा युक्रेनियन आत्मघाती ड्रोन स्पीड बोटच्या आकाराचा होता आणि त्यात शेकडो किलोग्रॅम स्फोटके होती. सागरी ड्रोनला रोखण्यासाठी रशियाने हेलिकॉप्टरमधून गोळीबार केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. रशियाने देखील एक युद्धनौका उद्ध्वस्त झाल्याचे म्हटले आहे. या नाविक तळावर रशियाची ३०-४० युद्धनौका तैनात आहेत.