वॉशिंग्टन - अमेरिकी प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या सॅन फ्रान्सिस्कोमधील घरामध्ये घुसून एका व्यक्तीने आज सकाळी हल्ला केला. या हल्लेखोराने नॅन्सी पेलोसी यांचे पती पॉल पेलोसी यांना मारहाण केली आणि त्यांच्यावर हातोड्याने हल्ला केला, अशी माहिती मिळत आहे. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या हल्ला करण्यामागच्या हेतूचा तपास केला जात आहे.
एका प्रवक्त्याने सांगितले की, ८२ वर्षीय पॉल पेलोसी यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. पेलोसी यांचे प्रवक्ते ड्रीव्ह हेमिल यांनी एका वक्तव्यामध्ये सांगितले की, स्पीकर आणि त्यांच्या कुटुंबातील घटनेनंतर त्यांची मदत करणाऱ्या आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आम्ही आभारी आहोत. दरम्यान, त्यांनी त्यांच्या खासगीपणाचा सन्मान ठेवावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
संसद सदस्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या कॅपिटल पोलिसांनी सांगितले की, नॅन्सी त्यांच्या पतीवर हल्ला झाला तेव्हा वॉशिंग्टनमध्ये होत्या. नॅन्सी ह्या युरोपमध्ये एक सुरक्षा संमेलन आटोपून याच आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये परत आल्या आहेत. कॅपिटल पोलिसांनी सांगितले की, एफबीआय आणि सॅन फ्रान्सिस्को पोलीससुद्धा तपास करत आहेत. सध्या हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, या हल्ल्यामुळे अमेरिकेतील संसद सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
नॅन्सी पेलोसी यांनी गेल्या महिन्यात तैवानचा दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्यामुळे अमेरिका आणि चीनमधील तणाव विकोपाला गेला होता. चीनने धमकी दिल्यानंतरही नॅन्सी यांनी हा दौरा पूर्णत्वास नेला होता. नॅन्सी यांची गणना अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली नेत्यांमध्ये होते.