खान युनूस/तेल अवीव : इस्रायली सैन्याने गाझा शहरातील सर्वात माेठ्या रुग्णालयासह काही रुग्णालयांवर शुक्रवारी भल्या पहाटे हल्ले केले. हमासचे दहशतवादी रुग्णालयात लपत असल्यामुळे हे हल्ले करण्यात आल्याचे इस्रायलने स्पष्ट केले. याशिवाय सीरियातील काही तळांवरही हवाई हल्ले करण्यात आले. त्यात ६ दहशतवादी ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. एकूण तीन रुग्णालयांना इस्रायलने लक्ष्य केले. त्यात एकाचा मृत्यू झाल्याचा दावा हमासने केला.
‘गाझाचा ताबा नकाेय’इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की, आमचा गाझावर पूर्ण ताबा मिळविण्याचा हेतू नाही. तेथे आमचे सरकार स्थापन व्हावे, अशीही आमची इच्छा नाही.
११ हजारांहून जास्त पॅलेस्टिनींचा मृत्यूगाझामधील संघर्षात ११ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती पॅलेस्टाइनच्या अधिकाऱ्यांनी दिली. इस्रायलने जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवारीही युद्धविराम घेतला. त्या कालावधीत गाझाच्या उत्तर भागातल्या हजारो पॅलेस्टिनी नागरिकांनी दक्षिण भागात पलायन केले.