न्यूयॉर्क : पंजाब सरकारमधील वरिष्ठ मंत्री व त्याच्याबरोबर अमेरिकेत गेलेल्या शिष्टमंडळावर नाराज असणाऱ्या शीख नागरिकांनी दगड व जोडे फेकले असून, त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पंजाब सरकारचे एनआरआय मंत्री तोता सिंग व पंजाबमधील अकाली नेत्यांचे एक शिष्टमंडळ क्वीन्स बरो येथील रिचमंड हिलवर भाषण देणार होते; पण घटनास्थळी शेकडो शीख नागरिक जमले व घेराव घालून घोषणा देऊ लागले. शीख नागरिक व अकाली नेते यांच्यातील हा तणाव तीन तास चालला. अखेर न्यूयॉर्क पोलिसांना बोलावल्यानंतर हा तणाव संपला. न्यूयॉर्क पोलिसांनी दोन युवकांना अटक केली असून, त्यांच्यावर अकाली दल नेत्यावर अटक केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. (वृत्तसंस्था) ही निदर्शने अमेरिकेतील शीख फॉर जस्टिस (एसएफजे) या संघटनेने केली होती. निदर्शकांनी अकाली नेत्यांवर जोडे व दगड फेकले, पोलिसांनी निदर्शकांना हुसकावून लावले असे एसएफजेने म्हटले आहे. एसएफजे संघटनेचा अकाली दल (बादल) सरकारला विरोध आहे. १९९० च्या काळात निष्पाप शीख युवकांना दहशतवादाच्या आरोपाखाली अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर या सरकारने कारवाई केली नाही असा एसएफजेचा आरोप आहे. पंजाबमधील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अमेरिकेतील शीख शिष्टमंडळ अमेरिका व कॅनडाचा दौरा करणार असून, शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांना आम्ही अमेरिकेत फिरू देणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. अकाली नेत्यांविरोधात निदर्शने करणाऱ्या अमेरिकी शीख संघटनांत एसएफजे, शीख युथ आॅफ अमेरिका, शिरोमणी अकाली दल (अमृतसर) अमेरिकन गुरुद्वारा प्रबंधक समिती यांचा समावेश होता.
न्यूयॉर्कमध्ये पंजाबी शिष्टमंडळावर हल्ला
By admin | Published: July 19, 2015 11:32 PM