नवी दिल्ली: अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान क्रूरता दाखवणार नाही असा दावा करत आहे, पण हळुहळू त्याचे वास्तव आता समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर काही फोटोज व्हायरल होत आहेत, ज्यात तालिबानी दहशतवादी अफगाणी नागरिकांना चाबकांनी मारहाण करत आहेत. तसेच, अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळावर पोहोचलेल्या लोकांना विमानतळात प्रवेश न देता त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले जात आहेत. दरम्यान, गुरुवारी रात्री काबूल विमानतळावर पुन्हा गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे.
तालिबानकडून भारताशी व्यापार करण्यास बंदी
अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने भारतातून आयात आणि निर्यातीवर बंदी घातली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) चे महासंचालक डॉ.अजय सहाय यांच्या मते, तालिबानने सध्या पाकिस्तानच्या पारगमन मार्गांवरून सर्व माल वाहतुकीवर बंदी घातली आहे. डॉ. सहाय म्हणाले की, भारत अफगाणिस्तानला साखर, औषधी, चहा, कॉफी, मसाले आणि ट्रान्समिशन टॉवर निर्यात करतो. त्याचबरोबर अफगाणिस्तानातून सुकामेवा आणि कांदा यासारख्या वस्तू आयात केल्या जातात.
अशरफ घनी यांना यूएईने दिला आश्रय
संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) मानवतावादी कारणास्तव अशरफ घनी आणि त्याच्या कुटुंबाला आश्रय दिला आहे. यूएईच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने याची पुष्टी केली आहे. दरम्यान, ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तान दूतावासाने इंटरपोलच्या माध्यमातून गैरव्यवहाराच्या आरोपावरुन फरार राष्ट्रपती अशरफ घनी, हमदुल्ला मोहिब आणि फजलुल्ला महमूद फजली यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.
तालिबानने अफगाण सैन्याचे 4 कमांडर मारले
कंधारमधील स्टेडियममध्ये जमावासमोर तालिबानने अफगाण सैन्याच्या 4 कमांडरची हत्या केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 15 ऑगस्ट रोजी घडली. हे कमांडर 13 ऑगस्ट रोजी तालिबानला शरण गेले होते. याशिवाय, कंधारमधील शाह वाली कोटचे पोलीस प्रमुख पाचा खान यांचीही तालिबानने हत्या केली आहे. तालिबानी समर्थकांनी सांगितल्यानुसार, पाचा खान हा एक क्रुर कमांडर होता, जो तालिबानी सैनिकांची नखे काढायचा.