जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी काही घोटाळ्यांप्रकरणी १५ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा भोगण्यास प्रारंभ केला. त्या पार्श्वभूमीवर ७ जुलैपासून त्या देशामध्ये प्रचंड दंगल सुरू आहे. त्या हिंसाचारात आतापर्यंत ७२ जण ठार झाले आहेत. मूळ भारतीय असलेल्या व दक्षिण आफ्रिकेत उद्योगसाम्राज्य उभारलेल्या गुप्ता कुटुंबीयांशी संगनमत करून झुमा यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप असून त्या रागातून दंगलखोर तेथील भारतीयांवर हल्ले चढवत आहेत.
दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीयांविरोधात उसळलेल्या दंगलीबाबत त्या देशाचे परराष्ट्रमंत्री ग्रेस नलेदी मंडिसा पँडोर यांच्याशी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चर्चा केली. दक्षिण आफ्रिका पोलिसांनी १२०० लोकांना अटक केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा व उद्योजक गुप्ता कुटुंबीय यांच्यात घनिष्ठ संबंध होते. उत्तर प्रदेशमधील सहारणपूर येथून १९९३ साली गुप्ता कुटुंबीय दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाले. त्यांनी तिथे अनेक उद्योग उभारले.
असे आहे गुप्ता कुटुंबीयांचे साम्राज्य
अजय, अतुल, राजेश गुप्ता हे बंधू तसेच अतुल यांचे भाचे वरुण व अमेरिकेत राहणारा अमोल यांनी दक्षिण आफ्रिकेत उद्योगधंद्यात जम बसविला. अतुल गुप्ता यांनी सहारा कॉम्प्युटर्स ही कंपनी स्थापन केली. तिचे भागभांडवल १० अब्ज डॉलर आहे. त्यानंतर गुप्ता बंधूंनी खाणी, वृत्तपत्रांसह अन्य प्रसारमाध्यमे अशा उद्योगांतही शिरकाव करून मोठे यश मिळविले. जेकब झुमा यांच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी गुप्ता बंधूंच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार केल्याचे आरोप काही वर्षांपासून होत आहेत. गुप्ता यांच्या अनेक कंपन्यांमध्ये जेकब झुमा यांचा मुलगा संचालक आहे. गुप्ता कुटुंबीयांवर झुमा यांनी मेहेरनजर केल्याचा आरोप आहे.