बांगलादेशमध्ये शनिवारी रात्री अज्ञात कट्टरतावादी हल्लेखोरांनी अनेक हिंदू मंदिरांवर हल्ला करून मूर्तींची मोडतोड केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा बांगलादेशमधील अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यादम्यान, बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमाँ खान यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ते म्हणाले की, बांगलादेशने देशामध्ये कधीही सांप्रदायिकतेवर विश्वास ठेवलेला नाही. तसेच त्याला पाठिंबाही दिलेला नाही. आमचं मुख्य लक्ष्य हे बांगलादेशला एक धर्मनिरपेक्ष देश बनवण्याचे आहे. आमच्या पंतप्रधान त्याच भावनेने काम करत आहेत. आमचा हिंदू समाज या देशामध्ये होता आणि कायम राहील.
बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की, सरकारजवळ हिंदूंना बाहेर करण्याची किंवा वंचित करण्याची कुठलीही योजना नाही आहे. आम्ही त्यांना प्राधान्य दिले आहे. ते सचिवालय आणि पोलीस विभागासह अनेक ठिकाणी सर्वोच्च पदांवर आहेत. अवामी लीग पक्षाची हिंदू समाजाला सहानूभुती आहे. येथे केवळ मुस्लिमांचा विजय होईल, असं अमावी लीग मानत नाही. त्यामुळे सर्व समुदायांचे लोक अवामी लीगला समर्थन देतात.
दरम्यान, पश्चिमोत्तर बांगलादेशमध्ये अज्ञात बदमाशांनी शनिवारी रात्री हल्ला करून १४ हिंदू मंदिरांमध्ये मोडतोड केली होती. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. ठाकूरगावच्या बलियाडांगी उपजिल्ह्यामध्ये एक हिंदू समुदायाचे नेते विद्यमान बर्मन यांनी सांगितले की, अज्ञात लोकांनी रात्री हा हल्ला घडवून आणला. त्यांनी १४ मंदिरांमधील मूर्तींची मोडतोड केली. उपजिल्ह्याच्या पूजा समारंभ परिषदेचे सरचिटणीस बर्मन यांनी सांगितले की, काही मूर्ती नष्ट करण्यात आल्या आहेत. तर काही मंदिरातील मूर्ती जवळच्या तलावामध्ये आढळून आल्या.