कॅनडाहून अवैधरित्या अमेरिकेमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांचा सेंट लॉरेन्स नदीमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये भारतीय कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. दलदलीच्या भागातून गुरुवारी दुपारी सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले. एका अर्भकाच्या बेपत्ता होण्यावरून या भागात शोध सुरु असताना हे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
कॅनडाच्या तटरक्षक दलाने ही शोधमोहिम राबविली होती. यावेळी क्युबेकच्या एका दलदलीच्या ठिकाणी हे सहा मृतदेह सापडले. ज्या लोकांचे मृतदेह सापडले आहेत, ते दोन कुटुंबातील असल्याचे मानले जात आहे. यापैकी दोन रोमानियाई आणि चारजण भारताचे नागरिक आहेत. अद्याप रोमानियाई कुटुंबातील लहान मुलगा मिळालेला नाहीय. त्याचा शोध आम्ही सुरु ठेवणार आहोत. हे सर्वजण कॅनडातून अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, असे अकवेस्ने मोहॉक पोलीस दलाचे उप प्रमुख ली-एन ओ'ब्रायन यांनी म्हटले आहे.
पोलिसांना तीन वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. त्याचा मृतदेह एका कॅनडाई पासपोर्टसोबत मिळाला, जो एका रोमानियाई कुटुंबाशी संबंधीत आहे. सध्यातरी मृतदेहांची ओळख पटविण्यात आलेली नाही. या भागात कार्यरत असलेल्या तस्करीच्या नेटवर्कशी मृत्यूचा संबंध असू शकतो की नाही हे आताच सांगता येणार नाही. पोलीस कॅनडाच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून मृतांच्या नातेवाईकांना देखील कळविण्याचा प्रयत्न होत आहे, असे ते म्हणाले.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी देखील या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही कुटुंबांसोबत काय झाले, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे. काय झाले ते नीट समजून घेतले पाहिजे. ते पुन्हा घडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करू.
अक्वेस्ने पोलिसांचे म्हणणे आहे की, जानेवारीपासून मोहॉक भागातून कॅनडा किंवा अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्याच्या 48 घटना घडल्या आहेत आणि त्यापैकी बहुतेक भारतीय किंवा रोमानियन वंशाचे आहेत.