Donald Trump Assassination Attempt : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न झाला आहे. बुधवारी (18 सप्टेंबर) लाँग आयलंडमध्ये ट्रम्प यांच्या रॅलीजवळ स्फोटकांनी भरलेली कार जप्त करण्यात आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, एक दिवस आधी, म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. एका रॅलीदरम्यान अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसने रायफलसह एका व्यक्तीला अटक केली होती. त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी फ्लोरिडामध्ये गोल्फ कोर्सच्या बाहेर त्याची बंदूक आणि खाद्य साहित्य घेऊन जवळपास 12 तास तळ ठोकून बसला होता. तो ट्रम्प यांची वाट पाहत होता. फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीचवर रविवारी जेव्हा ट्रम्प गोल्फ खेळत होते तेव्हा त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न उधळून आरोपीला अटक केली. पकडलेल्या आरोपीचं नाव रयान राऊथ असं आहे.
13 जुलै रोजी झालेला हल्ला
यापूर्वी 13 जुलै रोजी ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करत होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. ही गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले. पण, रॅलीत आलेल्या दोन लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी आरोपीला जागीच गोळ्या घातल्या होत्या.