रियाध : रमझानचा पवित्र महिना सुरू असताना आणि ईदला केवळ एक दिवस शिल्लक असताना जगभरातील मुस्लिमांचे सर्वात महत्त्वाचे धार्मिक स्थळ असलेल्या मक्क्याच्या काबा येथील बड्या मशिदीमध्ये आत्मघाती हल्ला करून ती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न येथील सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला.यामागे इसिसचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय आणखी तीन दहशतवादी संघटनांवर सौदी अरेबिया सरकारला संशय आहे. त्या संघटना स्थानिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या ग्रँड मशिदीपाशी घातपात घडवून आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्याला सुरक्षारक्षकांनी घेरले आणि ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दहशतवाद्याने लगेचच आपल्या शरीराला बांधलेल्या स्फोटकांद्वारे स्वत:लाच उडवून लावले. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की तो जागीच मरण पावला. शिवाय एका इमारतीची भिंत कोसळली आणि तिथे पार्क केलेल्या कारचा चक्काचूर झाला. याशिवाय ११ जखमी झाले असून, त्यात ५ सुरक्षारक्षक व सहा परदेशी नागरिक आहेत, अशी माहिती सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयाने दिली. सौदी अरेबियाचे राजे सलमान हेच या मशिदीचे सर्वेसर्वा आहेत. या प्रकारानंतर सुरक्षा यंत्रणेने पाच जणांना अटक केली असून, त्यांचा या दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय आहे. या पाच जणांमध्ये एक महिलाही असल्याचे सांगण्यात आले. रमझान महिन्यात जगभरातील लाखो मुस्लीम मक्का येथे येतात. यंदाही भाविक आले असताना मशीद उडवण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला आहे. याचा अधिक तपशील द्यायला सरकारी अधिकाऱ्यांनी नकार दिला. (वृत्तसंस्था)
मक्केमधील बडी मशीद उडवण्याचा प्रयत्न फसला
By admin | Published: June 25, 2017 12:47 AM