वॉशिंग्टन : चंद्रावरून पृथ्वीवर आलेल्या सुमारे साडेपाच किलो वजनाच्या उल्काखंडाची अमेरिकेतील ‘आरआर आॅक्शन’ या कंपनीने शनिवारी आयोजित केलेल्या लिलावात सहा लाख १२ हजार ५०० डॉलरना विक्री झाली.हा उल्काखंड एकूण सहा तुकड्यांचा मिळून बनलेला असून हे सहा तुकडे एकमेकांमध्ये घट्ट अडकलेले आहेत. वायव्य आफ्रिकेतील वाळवंटात गेल्या वर्षी मिळालेला हा उल्काखंड ‘एनडब्ल्यूए ११७८९’ या संकेत क्रमांकाने अधिकृतपणे ओळखला जातो; पण व्यवहारात त्याचे आफ्रिकी भाषेतील ‘बुगाबा’ (चांद्रिय कोडे) हे टोपणनाव रुढ आहे.कित्येक हजार वर्षांपूर्वी अन्य एका मोठ्या उल्केने चंद्राला धडक दिली तेव्हा चंद्राच्या पृष्ठभागाचा हा तुकडा निखळून वेगळा झाला व सुमारे अडीच लाख किमी प्रवास करून पृथ्वीवर पोहोचला, असे मानले जाते. मात्र, तुलनेने खूपच लहान असलेला हा उल्काखंड येताना वातावरणाच्या घर्षणाने जळून खाक कसा झाला नाही, हे मात्र न सुटलेले कोडे आहे. (वृत्तसंस्था)>६.१२ लाख डॉलरची व्हिएतनामची बोली‘आरआर आॅक्शन’ने दिलेल्या माहितीनुसार उल्काखंडासाठी ६.१२ लाख डॉलरची सर्वोच्च बोली व्हिएतनामच्या हा नाम प्रांतातील ताम चुक पॅगोडाच्या व्यवस्थापनाकडून आली. तेथे हा उल्काखंड वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.
चंद्रावरील उल्काखंडाचा ६ लाख डॉलरला लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 4:19 AM