ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. २४ - बायबल हे पारलौकिक जगातून अवतरले आहे यावर आणि जीझस हा देवपुत्र आहे यावर माझा विश्वास नाही हे मी खेदाने नमूद करत आहे, हा मजकूर असलेले चार्ल्स डार्विनचे हस्तलिखित पत्र लिलावामध्ये १,९७,००० डॉलर्सना विकले गेले आहे.
न्यू यॉर्कमध्ये नास्तिक असलेल्या विद्वान वैज्ञानिक डार्विनच्या पत्राचा लिलाव झाला. हे हस्तलिखित ९० हजार डॉलर्सना विकले जाईल असा अंदाज होता, परंतु दुपटीपेक्षा जास्त किंमत या पत्राला आलेली आहे.
उत्क्रांतीवादाच सिद्धान्त मांडून जगाच्या उत्पत्तीसंदर्भात महत्त्वाची दिशी देणा-या डार्विनचे धर्मविषयक मत काय होते हा अनेक काळ चर्चेचा विषय राहिलेला आहे. स्वत: डार्विनने या विषयावर जाहीर मतप्रदर्शन टाळले होते. आपलं मित्रमंडळ व कुटुंब यांच्या भावनांचा आदर व्हावा म्हणून डार्विनने मतप्रदर्शन टाळले असावे असा कयास आहे. परंतु फ्रान्सिस मॅकडरमॉट या तरूण वकिलाने डार्विन यांना पत्र लिहिलं आणि तुमची पुस्तकं वाचून माझी बायबलवरची श्रद्धा ढळू नये अशी विनंती केली आणि तुम्ही बायबल मानता की नाही हे हो किंवा नाहीमध्ये सांगा अशी विनंती केली. तुमचं उत्तर मी जाहीर करणार नाही असं वचनही मॅकडरमॉट यांनी दिलं.
दुस-याच दिवशी डार्विन यांनी आपला बायबलवर व जीझस देवपूत्र असल्याच्या श्रद्धेवर विश्वास नसल्याचं सांगितलं. मॅकडरमॉट यांनी आपला दिलेला शब्द पाळला आणि डार्विन यांचे धर्माविषय विचार जगापासून १०० वर्षांपासून अलिप्त राहिले. धर्मासंबंधीचे माझे विचार कधीही मांडणार नाही आणि मी स्वत:ला केवळ विज्ञानामध्ये वाहून घेईन अशी डार्विन यांची भूमिका होती. केवळ एक अपवाद होता, त्यांनी मॅकडरमॉट यांना लिहिलेल्या या हस्तलिखित पत्राचा. आज या पत्राचं मोल जगाच्या लक्षात येतंय. त्याचीच पावती म्हणजे या पत्राचा १,९०,००० डॉलर्सना झालेला लिलाव होय.