नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचे जगभरात सुरू असलेले थैमान रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी दोन लसींवर परिक्षण सुरू केले आहे. या संदर्भात गुरुवारी संशोधकांनी माहिती दिली. कॉमनवेल्थ अँड इंडस्ट्रीयल रिसर्च ऑर्गनायजेशनच्या (सीएसआयआरओ) संशोधक कोविड-१९च्या लसीचे परिक्षण करत आहेत.
ऑस्ट्रेलियातील आरोग्य आधिकाऱ्यांनुसार, कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी लवकरात लवकर लस शोधणे हा एकमेव मार्ग आहे. ऑस्ट्रेलियन एनिमल हेल्थ लॅबचे (एएएचएल) डायरेक्टर, प्रोफेसर ट्रेवर ड्रियू यांनी सांगितले की, आम्ही जानेवारीपासूनच SARS CoV-2 चा अभ्यास करत आहोत. यावरील लसचे लवकरच परिक्षण करणार आहोत.
ड्रियू पुढे म्हणाले की, आम्ही कोरनाच्या ऑपरेटींग स्पीडला अत्यंत सतर्कतेने संतुलित करत आहोत. कोरोनावर लसचे परिक्षण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागेल. हे परिक्षण सीएसआयआरओच्या बायोसिक्युरीटी सुविधा असलेल्या ‘एएएचएल’मध्ये करण्यात येणार आहे.
विविध आजारांपासून वाचण्यासाठी गेल्या वर्षी सीएसआयआरओने जागतिक पातळीवरील महामारी नियंत्रणात आणण्यासाठी ‘सीईपीआय’सोबत भागीदारी केली होती. सीईपीआय महामारी नष्ट करण्यासाठी लस विकसीत करते.
जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ९ लाख ४० हजार झाली आहे. केवळ अमेरिकेतच कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा दोन लाखांच्या पुढे गेला आहे. तर या महामारीमुळे मरणाऱ्यांची संख्या ४७ हजार झाली आहे. मृतांची संख्या इटलीत सर्वाधिक १३ हजार झाली आहे.