काल कॅनडाने खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंहच्या हत्ये प्रकरणी भारतावर आरोप केले. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. जगभरातूनही प्रतिक्रीया समोर येत आहेत. काल अमेरिकेनेही यावर भाष्य केले, तर आज ऑस्ट्रेलियानेही प्रतिक्रीया दिली आहे. 'या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे परंतु त्यासंबंधीचे अहवाल चिंताजनक आहेत. आम्ही आमच्या भागीदारांसह या समस्येचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. याशिवाय आम्ही या मुद्द्यावर भारताशीही बोललो आहोत, अशी प्रतिक्रीया ऑस्ट्रेलियाने दिली.
भारत-कॅनडा वाद; राजकीय लढ्यानंतर आता आर्थिक लढा, 'या' उद्योगांवर होणार मोठा परिणाम
ऑस्ट्रेलियाच्या वतीने परराष्ट्र मंत्री पेनी वांग यांनी ही टिप्पणी केली आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंहच्या हत्येबाबत कॅनडाने यात भारताचा हात असल्याचा आरोप केला आहे, तो आरोप भारताने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. कॅनडाच्या या वक्तव्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताविरुद्ध कारवाई करत कॅनडाने इंडियन इंटेलिजन्स रिसर्च अँड अॅनालिसिस विंगच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे.
भारतानेही प्रत्युत्तर देत कॅनडाच्या एका वरिष्ठ मुत्सद्द्याला पाच दिवसांच्या आत देश सोडण्यास सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वांग म्हणाले, "जे अहवाल समोर आले आहेत ते चिंताजनक आहेत. मी लक्षात घेतो की, तपास अजूनही सुरू आहे. आम्ही आमच्या भागीदारांसोबत या तपासावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि आम्ही ते करत राहू. ऑस्ट्रेलियाने हे मुद्दे भारतीय समकक्षांसमोर मांडले आहेत.
जपान, अमेरिका आणि भारतासोबत ऑस्ट्रेलियाही क्वाड समुहाचा भाग आहे. अशा परिस्थितीत जेव्हा पेनी वांग यांना विचारण्यात आले की, ती क्वाड सदस्य देश जपानसोबतही हा मुद्दा मांडणार का? त्यावर ते म्हणाले की, कोणत्याही देशाच्या परराष्ट्र मंत्र्याने कोणता मुद्दा आणि तो कसा मांडणार याबाबत सविस्तर बोलण्याची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. ऑस्ट्रेलियाचे तत्व हे आहे की सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे. कायद्याच्या राज्याचा आदर केला पाहिजे असे आमचे मत आहे. ऑस्ट्रेलियाची कल्पना त्या तत्त्वांना प्रतिबिंबित करते, असंही ते म्हणाले.