उद्योगपती गौतम अदानी आणि अदानी समूह सध्या वाईट काळाचा सामना करत आहे. अब्जावधींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. यातच ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी मात्र अदानींना आधार दिला आहे. गौतम अदानी यांच्याबाबत आपल्याला खूप आदर वाटतो, असं विधान टोनी अॅबॉट यांनी केलं आहे.
हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनुसार अदानी ग्रूपची पडझड सुरू झाली. कंपनीचे शेअर ऐतिहासिक पातळीवर घसरले. तर गौतम अदानींच्या संपत्तीतही प्रचंड घट झाली. अदानी समूहावरील आरोपांना प्रत्युत्तर देताना माजी पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अदानी आणि त्यांच्या समूहाबद्दल मला खूप आदर आहे. संबंधित नियामक संस्था अदानींवरील आरोपांची चौकशी करून त्यांचं काम करतील.
कारमाइकल कोळसा खाण प्रकल्पात अदानी समूहाच्या गुंतवणुकीबाबतही त्यांनी महत्वाचं विधान केलं. या खाणींमधून निर्माण होणाऱ्या कोळशामुळे भारतातील विद्युतीकरणाला नक्कीच चालना मिळेल, असं ते म्हणाले. 'मी अदानी खाणीच्या बाजूने आहे. मी अदानी आणि त्यांच्या टीमचे आभार मानतो की त्यांनी भारतीयांना वीज, रोजगार आणि ऑस्ट्रेलियाला समृद्धी देण्यासाठी खूप काही केलं आहे', असंही ते पुढे म्हणाले.
कोर्टाच्या निर्णयाचा केला निषेधमाजी पंतप्रधान टोनी अॅबॉट हे ऑस्ट्रेलियातील अदानी समूहाचे समर्थक मानले जातात. ऑस्ट्रेलियातील कारमाइकल कोळसा खाणींसाठीही त्यांनी अदानी समूहाला पाठिंबा दिला. २०१५ मध्ये, ऑस्ट्रेलियन न्यायालयाने अदानीच्या कोळसा खाण प्रकल्पाविरुद्ध निर्णय दिला तेव्हा त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून या निर्णयाचा निषेध केला.
टोनी अॅबॉट म्हणाले, 'माझ्या मते अदानी ही ऑस्ट्रेलियाच्या भल्याचा विचार करणारी व्यक्ती आहे. एक प्रचंड व्यावसायिक साम्राज्य उभारण्यात त्यांनी खूप मेहनत केली आहे आणि याही पुढील काळात त्यांच्या यशाबद्दल मला खात्री आहे'
अदानींना २०१९ मध्ये मिळालेलं कंत्राट२०१५ मध्ये, स्थानिक न्यायालयाने कारमाइकल कोळसा खाण प्रकल्पासाठी अदानीची पर्यावरणीय मंजुरी नाकारली. यानंतर, टोनी अॅबॉट यांनी सार्वजनिकरित्या याचे वर्णन 'व्यापक जगाला धक्का' असं केलं होतं. नंतर २०१९ मध्ये, अदानी समूहाला कारमाइकल कोळसा खाण प्रकल्पासाठी अंतिम परवानगी मिळाली होती.
अदानी समूह ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथे विकसित करत असलेली कोळसा खाण जगातील सर्वात मोठ्या कोळसा खाणींपैकी एक आहे. या खाणीतून मिळणारा कोळसा भारतातील वीज प्रकल्पांना नियमितपणे पुरवला जातो.