Georgie Purcell Australia MP: काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी AI हे तंत्रज्ञान चुकीच्या हातात पडल्यास काय होऊ शकते याचा साऱ्यांनाच विचार पडला. आता AI संबंधित असा एक प्रकार टीव्ही वृत्तवाहिनीवर घडल्याचे दिसून आले. ऑस्ट्रेलियातील एका मोठ्या वृत्तवाहिनीच्या ग्राफिक्स विभागाकडून एक विचित्र चूक झाली. महत्त्वाची बाब म्हणजे, तो फोटो एका महिला खासदाराचा होता त्यामुळे त्यावरून बराच मोठा वाद निर्माण झाला.
नक्की काय होतं प्रकरण?
व्हिक्टोरियन अपर हाऊसमधील सर्वात तरुण खासदार जॉर्जी पर्सेल यांच्या फोटोशी छेडछाड करण्यात आली. बदकांच्या शिकारीवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयावर जॉर्जी टीका करत होत्या. त्यांच्या वक्तव्यासोबतच त्यांचा एक फोटो बुलेटिन शोमध्ये चालवण्यात आला होता. त्यामध्ये त्यांच्या शरीराचा काही भाग हा विचित्र पद्धतीने दर्शवण्यात आला होता आणि फोटोतील छातीच्या भागाशीही छेडछाड करण्यात आली होती. या फोटोवरून गदारोळ झाला.
न्यूज चॅनेलला फटकारण्यासाठी पर्सेल यांनी त्यांचा मूळ फोटो आणि एडिट केलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. ही घटना एखाद्या पुरुष राजकारण्यासोबत घडली असती तर काय झाले असते, असेही जॉर्जी यांनी म्हटले. ऑस्ट्रेलियातील महिला खासदारांसोबत अशा गोष्टी होणे हा भेदभावाचा भाग आहे, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, या फोटोवरून झालेल्या गदारोळानंतर वृत्तवाहिनीने माफी मागितली आणि ही चूक फोटोशॉप आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची असल्याचे सांगितले. नाइन मेलबर्नचे न्यूज डायरेक्टर ह्यू नेयलॉन यांनी एका निवेदनात म्हटले की, आमच्या ग्राफिक्स विभागाने या बुलेटिनसाठी जॉर्जी यांचा एक फोटो तयार केला होता. आमच्या चॅनेलच्या बुलेटिनसाठी आम्हाला तो फोटो छोटा करावा लागला. त्या प्रक्रियेदरम्यान, फोटोशॉपने एक प्रतिमा तयार केली, जी चुकीची होती. घडलेल्या घटनेसाठी आम्ही पर्सेल यांची मनापासून माफी मागतो.