ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २१ - कर्णधार ब्रोनवन नॉक्स हिच्या नेतृत्वातील आॅस्ट्रेलियाचा महिलांचा वॉटरपोलो संघ रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र झाला आहे. संघाकडून खेळताना ब्रोनवन आणि गेमा ब्रेड्सवर्थ यांची ही तिसरी आॅलिम्पिक वारी ठरणार आहे. यापूर्वीच्या बीजिंग आणि लंडन आॅलिम्पिकमध्ये या खेळाडूंनी आॅस्ट्रेलियाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. याशिवाय १३ सदस्यांच्या या संघातील पाच खेळाडूंची ही दुसरी आॅलिम्पिक स्पर्धा असणार आहे. सहा खेळाडू पहिल्यांदा आॅलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या संघाने शांघाय येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत इटली, रशिया आणि ब्राझील संघाचा पराभव केला आहे. संघाकडे यापेक्षा अधिक दमदार कामगिरीची क्षमता आहे. शिवाय संघातील खेळाडूंना ८०० हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे, अशी माहिती संघाचे प्रशिक्षक ग्रेग मॅकफेडल यांनी दिली.