मेलबोर्न : भारतीय व्यावसायिकांत लोकप्रिय असलेला व्हिसा कार्यक्रम आॅस्ट्रेलियाच्या सरकारने मंगळवारी रद्द केला. या व्हिसावर ९५ हजार विदेशी कामगार सध्या आॅस्ट्रेलियात काम करीत असून, त्यात भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. भारतीय आयटी कंपन्यांत लोकप्रिय असलेल्या एच-१बी व्हिसावर बंधने आणण्याचा निर्णय अमेरिकेने अलीकडेच घेतला असून त्यापाठोपाठ आता आॅस्ट्रेलियानेही असेच पाऊल उचलले आहे. विदेशात काम करणाऱ्या भारतीयांसाठी ही बाब चिंताजनक आहे.४५७ व्हिसा या नावाने हा कार्यक्रम ओळखला जात होता. कौशल्यपूर्ण कामासाठी आॅस्ट्रेलियाई कामगार उपलब्ध न झाल्यास विदेशी कामगारांना चार वर्षांसाठी कामावर ठेवण्याची सवलत त्याअंतर्गत कंपन्यांना मिळत होती. विदेशी कामगारांमुळे आॅस्ट्रेलियातील स्थानिक बेरोजगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप होत होता. त्याची दखल घेऊन सरकारने हा व्हिसा कार्यक्रम रद्द केला आहे. आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी सांगितले की, वास्तविक आॅस्ट्रेलिया हा स्थलांतरितांचा देश आहे. तरीही आॅस्ट्रेलियाई कामगारांना प्राधान्य मिळायलाच हवे. त्यासाठी आम्ही हंगामी विदेशी कामगार आणण्यास परवानगी देणारा ४५७ व्हिसा कार्यक्रम रद्द करीत आहोत. आम्ही ‘आॅस्ट्रेलियन फर्स्ट’ असे नवे धोरण अंगीकारत आहोत.एबीसीने आपल्या वृत्तात म्हटले की, ३0 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार आॅस्ट्रेलियात ९५,७५७ विदेशी कामगार ४५७ व्हिसावर होते. त्यात भारतीय कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. त्याखालोखाल ब्रिटन आणि चीनचे कामगार आहेत. (वृत्तसंस्था)
आॅस्ट्रेलियाचा लोकप्रिय व्हिसा रद्द
By admin | Published: April 19, 2017 1:56 AM