व्हिएन्ना : ऑस्ट्रियामध्ये (Austria) कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या (Coronavirus) वाढत्या घटना रोखण्यासाठी आजपासून देशव्यापी लॉकडाऊन (Complete Lockdown) लागू करण्यात आला आहे. ऑस्ट्रियासह युरोपातील अनेक देशांमध्ये नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचे रुग्ण (Covid-19) सातत्याने वाढत आहेत. परिस्थिती अशी आहे की, काही देशांच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर वाईट परिणाम होत आहे.
ऑस्ट्रियामध्ये लागू केलेला लॉकडाऊन जास्तीत जास्त 20 दिवसांचा असणार आहे. दरम्यान, 10 दिवसांनंतर याचे रिव्ह्यू केले जाणार आहे. यादरम्यान लोकांना विनाकारण घराबाहेर पडण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशभरातील सर्व रेस्टॉरंट आणि बहुतांश दुकाने बंद राहतील. तसेच, सर्व प्रकारचे मोठे कार्यक्रम रद्द केले जाणार आहेत. तर शाळा आणि 'डे-केअर सेंटर' सुरू राहतील, परंतु पालकांना मुलांना घरी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ऑस्ट्रियामध्ये 13 डिसेंबर रोजी लॉकडाऊनचे निर्बंध उठवले जाऊ शकतात, परंतु ज्यांचे लसीकरण झाले नाही, त्यांच्यासाठी हे निर्बंध सुरू राहण्याची शक्यता आहे. काल रविवारी मध्य व्हिएन्नातील बाजारपेठांनी ख्रिसमसच्या खरेदीचा आनंद घेण्यासाठी आणि लॉकडाऊनपूर्वी प्रवास करण्यासाठी व्हिएन्नाच्या बाजारपेठेत गर्दी केली होती.
'फेस्टिव्ह सीजनवरून वाढली चिंता'या लॉकडाऊनची घोषणा करताना देशाचे चान्सलर अलेक्झांडर शालेनबर्ग यांनीही सांगितले होते की, पुढील वर्षी 1 फेब्रुवारीपासून येथील लोकांसाठी लसीकरण अनिवार्य केले जाऊ शकते. यानंतर कोरोनाची लस न घेणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद असू शकते. अशा लोकांवर इतर अनेक प्रकारची बंधने लादली जाऊ शकतात. विशेष म्हणजे, जगभरातील ख्रिश्चन समुदायाचे लोक ख्रिसमसच्या सणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे अनेक सण नीट साजरे झाले नाहीत. या वर्षी आतापर्यंत परिस्थिती सामान्य होती, परंतु युरोपमधील काही देशांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढले आहेत, ज्यामुळे स्थानिक लोकांची तसेच त्या व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे, ज्यांचे कोरोनामुळे आधीच खूप नुकसान झाले आहे.