व्हॅटिकन सिटी : ख्रिसमस शुक्रवारी जगभरात साजरा झाला. येशू जन्माचा उत्साह सर्वत्र दिसला. ख्रिश्चन बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. विविध चर्चमध्ये सजवलेल्या ख्रिसमस ट्रीमुळे सणाची शोभा अधिकच वाढली. भारतासह सर्व ठिकाणी चर्चमध्ये मध्यरात्रीची प्रार्थना सभा झाली. पोप फ्रान्सिस यांनी जगभरातील ख्रिश्चनांची कानउघाडणी करीत भौतिकवादाच्या आहारी न जाण्याचे आवाहन केले. पोप फ्रान्सिस यांनी आपल्या भाषणात दया, करुणा व न्याय या त्रिसूत्रीवर भर दिला. ते म्हणाले की, आपण पापी व्यक्तीच्या बाबतीत निर्दयी असतो व पापाबाबत दयाळू असतो. प्रत्येकाला योग्य न्याय मिळेल असे वातावरण आपण तयार केले पाहिजे. प्रत्येकाने आपल्याला पारखत देवत्वापर्यंत गेले पाहिजे. सांस्कृतिक मतभेद बऱ्याचदा निर्दयी होताना दिसत आहेत असा उल्लेख करून पोप म्हणाले की, आपण सहानुभूती, अनुकंपा व दया भावनेने सर्वांनी प्रार्थना केली पाहिजे. त्यांच्या या विधानाला सिरियातील निर्वासितांचा संदर्भ होता. यावर्षी सिरियातील अस्थिरतेमुळे जवळपास एक दशलक्ष लोक युरोपात आश्रयाला आले आहेत. हे वर्ष निर्वासितांचे ठरले आहे. पोप यांचा उपदेश सुरू असताना सेंट पिटर्सबर्ग चौकात कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होता. गोव्यातील सर्व चर्चमध्येही मध्यरात्रीची प्रार्थना झाली. ख्रिस्ती बांधव नवीन कपडे परिधान करून पुष्पगुच्छ, मेणबत्ती, केक बरोबर घेऊन रात्री प्रार्थनेसाठी चर्चमध्ये येत होते. गोव्यातील एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश कॅथॉलिक पंथीय आहेत. (वृत्तसंस्था)