उत्तर आफ्रिकेतील इस्लामिक देश असलेल्या मोरोक्कोच्या राजाने यावर्षी बकरी ईदला मेंढ्यांची कुर्बानी देऊ नये, असे आवाहन केले आहे. आपल्या देशातील नागरिकांना आवाहन करताना राजा मोहम्मद सहावे म्हणाले, "आपला देश सलग सातव्या वर्षी दुष्काळाचा सामना करत आहे. यामुळे देशातील पशुधन मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. तसेच, मांसाच्या किमतीही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यामुळे कुर्बानी देऊ नये. खरे तर, जगभरातील मुस्लीम दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी लाखो मेंढ्या, बकरे आणि इतर प्राण्यांचा कुर्बानी देत असतात.
यावर्षी ईद-उल-अजहा अथवा बकही ईद ६ जून अथवा ७ जून रोजी साजरी केली जाणार आहे. हा इस्लामच्या दोन प्रमुख सणांपैकी एक सण आहे. यालाच बकरी ईद, ईद उल जुहा, बकरा ईद अथवा ईद उल बकरा असेही म्हटले जाते. बकरी ईदला नमाज पठण करण्याची आणि प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. कुर्बानीनंतर, मुस्लीम समाज ते मांस आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत वाटून खातात. तसेच, त्यातील काही भाग गरिबांना दान देखील केला जातो.
यासंदर्भात, धार्मिक व्यवहार मंत्र्यांनी बुधवारी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर राजे मोहम्मद सहावे यांचे भाषण वाचले. यात, "आपला देश हवामान बदल आणि आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे. परिणामी पशुधनात लक्षणीय घट झाली आहे. यामुळे बकरी ईदच्या दिवशी प्राण्यांची कुर्बानी टाळावी," असे म्हणण्यात आले आहे. बकरी ईद या सणाचे महत्त्व स्वीकारून, राजाने आपल्या जनतेला कुर्बानी टाळण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाचे म्हणजे, मोहम्मद सहावे यांचे वडील हसन द्वितीय यांनीही 1966 मध्ये देशातील जनतेला, याच प्रकारचे आवाहन केले होते. तेव्हा देशात मोठा दुष्काळ पडला होता.