ऑनलाइन लोकमत -
वेलिंग्टन (न्यूझीलंड), दि. 19 - सध्या पोकेमॉन व्हायरल होऊ लागला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण फक्त पोकेमॉन खेळण्याकरिता एका व्यक्तीने आपली नोकरी सोडली असल्याची घटना न्यूझीलंडमध्ये घडली आहे. टॉम करी असं या व्यक्तीचं नाव आहे. ऑकलंड येथील हिबिस्कस समुद्रकिनारी असणा-या एका रेस्टॉरंटमध्ये बार टेंडर म्हणून काम करणा-या टॉम करीने पोकेमॉनच्या वेडापायी आपली नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला.
मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या मॅनेजरने मला सहकार्य केलं. पण माझे आई-वडिल खुपच घाबरले होते असं टॉम करीने सांगितलं आहे. आपण घेतलेल्या या निर्णयाचा टॉमला प्रचंड आनंद झाला असून यामधील फिरतीचा भाग त्याला खूपच आवडला आहे. आत्तापर्यंत त्याने 151 पैकी 91 पोकेमॉन मिळवले आहेत. टॉमला अनेक मित्रांना भेटण्याची तसंच विविध ठिकाणी फिरण्याची संधी मिळत आहे. 'मी अशा अनेक ठिकाणी फिरत आहे जिथे मला जाण्याची संधी मिळाली नसती', असं टॉम करीने सांगितलं आहे.
काय आहे पोकेमॉन जाणून घ्या
'मी गेली 6 वर्ष सलग काम करत आहे. मला कामातून ब्रेक हवा होता. मला साहसाची आवड आहे, आणि पोकेमॉनमुळे मला ते स्वप्न जगण्याची संधी मिळणार होती. मी सुरुवातीला माझ्या मॅनेजरला नोकरी सोडत असल्याचं सांगितलं नव्हतं. पण जेव्हा माझी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली तेव्हा मी त्यांना फोन केला. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या', असं टॉमने सांगितलं आहे.
टॉम करी दोन महिन्यांसाठी संपुर्ण देशात प्रवास करणार आहे. त्याने 20 बस ट्रीपही बुक केल्या असून आतापर्यंत 6 बेटांवर प्रवास केली आहे. पोकेमॉन खेळ संपल्यानंतर टॉम पुन्हा नवीन नोकरी शोधणार आहे किंवा एखादा व्यवसाय सुरु करणार आहे.
कसा खेळायचा पोकेमॉन -
अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित नीअँटिक या गेमिंग कंपनीने लहान मुलांच्या विश्वातील लोकप्रिय कार्टून मालिकेतील पोकेमॉन या कार्टून कॅरेक्टरला केंद्रस्थानी ठेवून हा गेम तयार केला आहे. हा गेम खेळण्यासाठी आपल्या मोबाइलमधील जीपीएस या तंत्राचा वापर अनिवार्य आहे. जीपीएस यंत्रणा चालू करून हा गेम खेळण्यास सुरुवात करण्यासाठी वापरात असलेला मोबाइल हा हातात घेऊन तुम्हाला प्रत्यक्ष स्वत:हून वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करावी लागते. ही भटकंती चालू असताना तुम्ही प्रत्यक्ष जगात म्हणजेच तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी सध्या कुठे आहात हे या गेममध्ये तपासले जाते आणि हा गेम खेळताना तुमच्या मोबाइलवर ते तुम्हाला जीपीएसच्या माध्यमातून नकाशावर दाखवले जाते. आत्ता हा गेम तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच्या आसपास आभासी जगतात तुमच्या मोबाइलवरील नकाशात त्या ठिकाणी पोकेमॉन कुठे लपले आहेत ते तुम्हाला दाखवते; आणि तुम्हाला त्या पोकेमॉनला पोकबॉल या एक चेंडूप्रमाणे दिसणाऱ्या गोष्टीला पोकेमॉनकडे फेकून पोकेमॉनला तुमच्या जाळ्यात पकडावे लागते. या गेमची संरचना अशा प्रकारे केली असल्याने हा गेम एका ठिकाणी किंवा एका विशिष्ट जागेच्या परिघात बसून खेळणे अशक्य आहे. त्यामुळे हा गेम खेळण्यासाठी प्रत्यक्ष घराबाहेर पडणे हे भाग पडते आणि जास्तीतजास्त पोकेमॉन पकडण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जावे लागते. दुसरी बाब अशी की हा गेम एकट्याने जरी खेळावा लागत असला तरी तो खेळणारे इतर लोक हे तुमच्यासोबत स्पर्धा करतात.