जगभरातील देशांमध्ये लग्न झालेल्या जोडप्यांसाठी विभक्त होण्यासाठी घटस्फोट घेण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. काही देशांमध्ये घटस्फोट घेण्याची प्रकिया सोपी आहे, तर भारतासारख्या देशामध्ये घटस्फोट घेणे कठीण आहे. दरम्यान, लंडनमध्ये असे एक प्रकरण समोर आले आहे, जे वाचून तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल. या ठिकाणी एका जोडप्याचा कोर्टाने घटस्फोट मंजूर केला आहे. आयशा वरदाग यांच्या लंडनमधील लॉ फर्म वरदागच्या सॉलिसिटरच्या एका चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला आहे.
विशेष म्हणजे कोर्टाने घटस्फोटाचा निर्णय मागे घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान, विलियम्स पती-पत्नी यांच्या लग्नाला २१ वर्ष झाले आहेत. पण, कोर्टाने अचानक त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. हे दाम्पत्य घटस्फोट घेणार होतं, पण विभक्त होण्याआधी आर्थिक सेटेलमेंट करण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार होती. याच दरम्यान, दुसऱ्या दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या अंतिम आदेशादरम्यान, वरदाग लॉ फर्मच्या क्लर्कने चुकून कॉम्प्युटरवर ड्रॉप डाउन मेनूमधून मिस्टर आणि मिसेस विलियम्स यांची नावे सिलेक्ट केली. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. दाम्पत्याचे २१ वर्षांचे नाते २१ मिनिटात तुटले.
दरम्यान, यासंबंधी माहिती कोर्टाला देण्यात आली. मात्र कोर्टाने आपला निर्णय मागे घेण्यास नकार दिला आणि सांगितले की, कोर्टाच्या निर्णयावर जनतेचा विश्वास जास्त आवश्यक आहे. कोर्टाच्या फॅमिली डिव्हिजनचे अध्यक्ष सर अँड्र्यू मॅकफार्लेन म्हणाले, अंतिम घटस्फोटाच्या आदेशाद्वारे मिळणारी निश्चितता व निर्णयाचा आदर करणे आणि त्याद्वारे स्थापित केलेली स्थिती कायम राखण्यात एक मजबूत सार्वजनिक धोरण स्वारस्य आहे.
दुसरीकडे, वरदागच्या प्रतिनिधीने सांगितले की, फर्मच्या एका वकिलाने एका जोडप्याच्या आर्थिक सेटलमेंट प्रकरणात अर्ज केला होता. पण, त्याच्याकडून ऑनलाईन पोर्टलवर चूक झाली. त्यामुळे तूर्तास तयार नसलेल्या दाम्पत्याचा घटस्फोट झाला आहे. फर्मला दोन दिवसांनी आपली चूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर फर्मकडून कोर्टाकडे आदेश रद्द करण्याची विनंती करण्यात आली. पण, कोर्टाने असे म्हटले की, अशा प्रकरणात अंतिम निर्णय देण्यासाठी मोठ्या प्रक्रियेतून जावे लागते. त्यामुळे अशा प्रकारची चूक कशी होऊ शकते.
वरदाग फर्मने कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. कॉम्प्युटरच्या चुकीमध्ये घडलेल्या प्रकारात लोकांना घटस्फोट देणे योग्य नाही. चूक अधोरेखित केल्यानंतर कोर्टाने आमची बाजू समजून घ्यायला हवी होती. ऑनलाईन सिस्टिममध्ये झालेल्या चुकीमध्ये एखाद्याचा घटस्फोट होत असेल तर ते कितपत योग्य आहे. हा न्याय नाही, असे फर्मने म्हटले आहे.