वाॅशिंग्टन : ‘अल-कायदा’ या जगातील धाेकादायक दहशतवादी संघटनेचा म्हाेरक्या अयमान अल जवाहिरी याचा अमेरिकेने ड्राेन हल्ल्यात खात्मा केला. ज्या प्रकारे ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात हुडकून ठार करण्यात आले, त्याच पद्धतीने जवाहिरीलाही अमेरिकेने शाेधून काढले आणि याेग्य संधी साधून ठार केले. अमेरिकन गुप्तचर संस्था जवळपास १२ महिन्यांपासून जवाहिरीच्या मागावर हाेत्या. जवाहिरीची घराच्या बाल्कनीमध्ये राेज सकाळी फेऱ्या मारण्याची सवय अमेरिकेने हेरली आणि त्याचा क्षणात खात्मा केला.
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा गेल्या १२ महिन्यांपासून जवाहिरीच्या मागावर हाेत्या. जवाहिरी हा पत्नी, मुलगी आणि नातवासह काबुलमध्ये एका घरात राहायला गेल्याची माहिती या वर्षी जानेवारीत अमेरिकेला मिळाली. त्यानंतर त्या घरावर पाळत ठेवली. जवाहिरी व त्याच्या कुटुंबीयांनी स्वत:चे अस्तित्व लपवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले हाेते. मात्र, अमेरिकेला त्याच्या वास्तव्याची खात्री पटण्याएवढे पुरावे मिळाले हाेते.
भारतासाठी चिंतेची बाबअयमान अल-जवाहिरीचे मारले जाणे हा भारतातील अल-कायदाचे समर्थक व हस्तकांना मोठा धक्का असला तरी तालिबानने जवाहिरीला काबूलमध्ये आश्रय देणे ही भारताची चिंता वाढवणारी बाब आहे. कारण, तालिबान जवाहिरीप्रमाणे भारताला लक्ष्य बनवणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनाही आश्रय देऊ शकतो, असे भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
डोळ्यांचा निष्णात सर्जन होता जवाहिरीअल-जवाहिरी अभ्यासात अतिशय हुशार हाेता. ताे डोळ्यांचा निष्णात सर्जन होता. अल-जवाहिरीचा जन्म इजिप्तची राजधानी कैरोमध्ये १९ जून १९५१ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. या कुटुंबात डॉक्टर्स आणि स्कॉलर्सही होते. जवाहिरीने राजकारणासाेबतच कैरो विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण सुरू ठेवले. १९७४ मध्ये पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर पुढे चार वर्षे सर्जरी (शल्यचिकित्सा) मध्ये मास्टर्स डिग्रीसाठी अभ्यास केला. जवाहिरी हा बिन लादेनचा उजवा हात म्हणून ओळखला जायचा. जानेवारी २००६ मध्ये पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर अमेरिकेने मिसाईल हल्ला केला होता, त्यात अल कायदाचे चार सदस्य मारले गेले, पण जवाहिरी वाचला हाेता.