कोल्हापूर :- जिल्हयातील 50 किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या लोकांना प्रतिबंधात्मक व रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद तसेच होमिओपॅथी औषधे पुरविण्यात येणार असून यासाठीची गावनिहाय माहिती तात्काळ तयार करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थान प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक तसेच नियंत्रणात्मकउपाययोनांचा आढावा आणि नियोजनासाठी आज समन्वयक संजय शिंदे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी वेबेक्स व्हीसीव्दारे जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी आणि तहसिलदारांशी संपर्क साधून आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 50 किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या लोकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
आयुष मंत्रालयाने सुचित केल्यानुसार कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीप्रतिबंधात्मक तसेच नियंत्रणात्मक उपाययोजना करणे व रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे यासाठी जिल्ह्यातील 50 व त्याहून अधिक वय असणाऱ्या लोकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद तसेच होमिओपॅथी औषधे पुरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी 50 व त्याहून अधिक वय असणाऱ्या लोकांची गावनिहाय माहिती तयार करुन त्यानुसार औषधे दिली जाणार आहेत.
यासाठी गाव तसेच तालुकानिहाय नियोजन करणे गरजेचे आहे. अशी माहिती संकलित करण्यासाठी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्यांचा आधार घेण्यात येणार आहे. यासाठी महाआयुष ॲप तयार केले असून त्यामध्ये ही माहिती भरण्यात येणार आहे. हे काम युध्दपातळीवर करायचे असल्याने सर्व गटविकास अधिकारी आणि आरोग्य विभागातील कर्मचारी विशेषत: आशा वर्कस यांनी सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे.
जिल्हयाच्या ग्रामीण भागातील जवळपास 11 लाखाहून अधिक लोकांना आयुषचिकीत्सा प्रणालींतर्गत आयुर्वेद तसेच होमिओपॅथी औषधे पुरविण्यात येणार आहेत. यासाठीचा खर्च जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर जिल्हयाबाहेरुन तसेच अन्य राज्यातून येणाऱ्या लोकांची संख्या मोठी असणार आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या आदेशांचे महानगरपालीका, नगरपालीका- नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतीनेकाटेकोरपणे पालन करण्याची सूचना करुन शिंदे म्हणाले की, जिल्हयात कोरोनाचे संकट थोपवून धरण्यात सर्व यंत्रणाबरोबरच जिल्हयातील जनतेचे फार मोठे योगदान आहे. यापुढेही कोरोना विषाणू रोखण्यासाठी शहर तसेच गावागावात खंबीर आणि कठोर भुमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.